
मुंबई-महाराष्ट्रासह देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात आता ‘शिवानी’ अस्वलाच्या सोबतीला रुबाबदार ‘शिवा’ नरही आला आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी आणखी एक आकर्षण वाढले आहे.
पालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचा पालिकेच्या माध्यमातून कायापालट करण्यात येत आहे. यामध्ये 2017 मध्ये हंबोल्ट पेंग्विन आणल्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या हजारेंनी वाढली आहे. दररोज 15 ते 20 हजारांपर्यंत मिळणारे उत्पन्न आता दिवसाला एक ते सहा लाखांपर्यंत वाढले आहे. या ठिकाणी सध्या दररोज पाच ते सहा हजार, तर सुट्टीच्या दिवशी 20 हजारांहून जास्त पर्यटक येत आहेत. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन पक्षी-प्राणी आणले जात असून सोयीसुविधाही निर्माण करण्यात येत आहेत.
असे आहे उद्यान-प्राणिसंग्रहालयाचे आकर्षण
– पालिकेच्या या उद्यान क प्राणिसंग्रहालयात नऊ पेंग्विन, दोन काघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे 13 जातीचे 84 सस्तन प्राणी, 19 जातींचे 157 पक्षी आहेत. याशिवाय 283 प्रजातींचे आणि 6611 वृक्ष-वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षीही आहेत.
असा आहे अस्वलाच्या आहाराचा मेनू
– काही दिवसांपूर्वी या ठिकाणी आणलेल्या नर ‘शिवा’ नराला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. त्यानंतर आता मादीसोबत सोडण्यात आले आहे. आता या दोघांची जोडी चांगलीच जमली आहे.
– या दोन्ही अस्वलांचे वय सुमारे 5 ते 6 वर्षे आहे. या अस्वलांना कलिंगड, पपई, चिकू, पेरू, काकडी, गाजर, तांदळाची खीर, पेज अशा प्रकारच्या आहाराचा मेनू दिला जातो, अशी माहिती जीवशास्त्रज्ञ अभिषेक साटम यांनी दिली.
































































