गुजरातवर गुंतवणुकीचा वर्षाव, दर तासाला पाच कोटींची गुंतवणूक

अदानी समूह गुजरातमध्ये पाच वर्षांत दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. म्हणजेच पाच वर्षे दर तासाला पाच कोटी रुपये, दरवर्षी 40 हजार कोटी रुपये, दर महिना सरासरी 333 कोटी रुपये आणि एका दिवसात 111 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

एलन मस्क अनुपस्थित

इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी टेस्लाचे मालक एलन मस्क व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024 मध्ये अखेर आले नाहीत. एलन मस्क गुजरातमधील व्हायब्रंटला येणार असल्याची चर्चा होती. टेस्लाचा प्लांट गुजरातमध्ये उघडण्याची ते घोषणा करतील, असेही बोलले जात होते.

व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर संमेलनात अंबानी, अदानी, टाटा, पेटीएमपासून अनेक कंपन्यांनी गुजरातमध्ये अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. अदानी समूह पुढील पाच वर्षांत गुजरातमध्ये दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामुळे गुजरातमध्ये लाखो रोजगार उपलब्ध होणार आहेत. रिलायन्स समूह जामनगरमध्ये पाच हजार एकरमध्ये धीरुभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्स सुरू करणार आहे. यामुळे हजारो नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या दहा वर्षांत 150 अब्ज डॉलरहून जास्त गुंतवणूक केली असून यातील दोन तृतीयांश गुंतवणूक केवळ गुजरातमध्ये केली आहे, असे मुकेश अंबानी यांनी सांगितले. वेलस्पन वर्ल्ड गुजरातमध्ये हरित हायड्रोजन आणि हरित अमोनियासाठी 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. टाटा समूह गुजरातच्या धोलेरामध्ये सेमीकंडक्टर फॅब बनवणार आहे. तसेच सानंदमध्ये लिथियम आयन बॅटरी बनवण्यासाठी 20 गीगावॉटची गीगा फॅक्टरी सुरू करणार आहे. जागतिक लॉजिस्टिक फर्म डीपी वर्ल्डने गुजरात सरकारसोबत 25 हजार कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

नव्या कंपनीची घोषणा

महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) ने  ‘महानगर एलएनजी प्रायव्हेट लिमिटेड’च्या स्थापनेची घोषणा केली. एमजीएलचे बैद्यनाथ एलएनजी प्रायव्हेट लिमिटेडबरोबरचे जॉइंट व्हेंचर आहे. नव्याने स्थापन झालेल्या संस्थेत जे. पी. एन. मूर्ती यांची सीईओ पदावर नेमणूक करण्यात आली आहे.

मारुती कारवर डिस्काऊंट

मारुती सुझुकीने नव्या वर्षात आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. मारुती सुझुकी एरिना डीलर्स या महिन्यात  Alto K10, S Presso, Celerio, Wagon R, Swift  आणि Dzire मॉडल्सवर डिस्काऊंट आणि बेनिफिट्स ऑफर करीत आहे. ज्यात कॅश डिस्काऊंट आणि एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट ऑफरचा समावेश आहे.

चार बँकेचे लोन महाग

भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी बँक, बँक ऑफ बडोदा आणि आयडीएफसी बँकेने नुकतेच आपल्या एमसीएलआरमध्ये बदल केल्याने या बँकेकडून कर्ज घेतलेल्या ग्राहकांचा ईएमआय महाग झाला आहे. एसबीआयने 15 डिसेंबरपासून एका वर्षासाठीचा एमसीएलआर 8.65 टक्के केला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन सेल

ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन मोठय़ा कंपन्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सेलची घोषणा केली आहे. फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल 14 जानेवारीपासून सुरू होणार असून 19 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये एक्सक्लूसिव ऑफर आणि मोठा डिस्काऊंट मिळणार आहे. ऍमेझॉनने सेलची अद्याप घोषणा केली नाही पण, आपल्या वेबसाईटवर ऍमेझॉन सेल पेज लाईव्ह केले आहे.

ह्युंदाईची 6180 कोटींची गुंतवणूक

ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड तामीळनाडूमध्ये हायड्रोजन संशोधन केंद्राची स्थापना करणे आणि विविध अन्य कामांसाठी 6180 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे. याआधी ह्युंदाईने 2023 ते 2032 या दहा वर्षांत इलेक्ट्रिक वाहन, चार्ंजग, कौशल्य विकास वाढवण्यासाठी 20 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. 6180 कोटी रुपयांची गुंतवणूक वेगळी आहे. कंपनीने तामीळनाडू जागतिक गुंतवणूक संमेलन 2024 मध्ये गुंतवणुकीसंबंधी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

शेअर बाजारात पैशांचा पाऊस

हिंदुस्थानी शेअर बाजारात आज धमाकेदार सुरुवात झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोघांनीही आपला मागील उच्चांकाचा रेकॉर्ड मोडला. गुंतवणुकदारांनी अवघ्या एका दिवसात तीन लाख कोटी रुपये कमावले. सेन्सेक्समध्ये 847 अंकांची वाढ दिसली, तर निफ्टी पहिल्यांदा 21,900 पार पोहोचले. इन्फोसिस शेअरमध्ये सर्वात जास्त 7.98 टक्के. महिंद्रा, एचसीएल टेक, विप्रो आणि टीसीएसचे शेअर्स वाढले.

मुकेश अंबानी श्रीमंतीत पुन्हा अव्वल

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे पुन्हा एकदा हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची नेटवर्थ 2.8 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 23 हजार कोटी रुपयांनी वाढून 101.8 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 8.46 लाख कोटी रुपये झाली आहे. अंबानी जून 2022 नंतर पहिल्यांदा 100 बिलियन डॉलर क्लबमध्ये सहभागी झाले आहेत. अंबानी यांच्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीजची 42 टक्के भागीदारी आहे.

360 वन प्राईम लिमिटेड कंपनी कर्जरोख्यांच्या माध्यमातून एक हजार कोटी रुपये उभे करणार आहे. या इश्यूचा पहिला टप्पा विक्रीसाठी 11 जानेवारीला सुरू झाला असून 24 जानेवारीला संपणार आहे. एनसीडीएसचा पहिला भाग इश्यूबेस इश्यू 200 कोटी रुपयांपासून ते एकूण 800 कोटी रुपयांपर्यंत असा एकूण एक हजार कोटी रुपयांचा असेल. असे कंपनीचे सीईओ हिमांशू जैन यांनी सांगितले.

मकर संक्रांती स्पेशल

कॅफे आकासा एअरच्या ऑनबोर्ड मिल सर्व्हिसने सण-उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यासाठी नवीन मेन्यूसह पुन्हा एकदा आपल्या मकर संक्रांती स्पेशल मिल सादर केली आहे. यात पुरणपोळी, तीळ ड्रायफ्रूटसह प्रवाशांच्या आवडत्या पेयांचा समावेश आहे.

बँकेशी भागीदारी

बजाज फिनसर्व्हची उपकंपनी असलेल्या बजाज मार्केट्सने उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेची मुदत ठेवींची अर्थात फिक्स्ड डिपॉझिट्सची सोय उपलब्ध करून देण्यासाठी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेशी भागीदारी केली.

स्पर्धा नोंदणीस मुदतवाढ

नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी), कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (एमएसडीई) ची इंडिया स्किल्स 2023-24 स्पर्धेच्या नोंदणीची अंतिम मुदत 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

प्रेस्टिजचे नवे प्रोडक्ट

प्रसिद्ध प्रेस्टिज कंपनीने स्वयंपाकघरासाठी एस हॅण्ड ब्लेंडर आणले आहे. जे कुकिंगचा अनुभव खास बनवते. एस हॅण्ड ब्लेंडरवर एका वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे. याची किंमत 1,295/- आहे, मात्र ग्राहकांना ते सवलतीच्या दरात फक्त 970 रुपयांत उपलब्ध आहे.