
सामना प्रतिनिधी । मुंबई
नाटककार विजय तेंडुलकर. त्यांच्या नाटकांतील स्वगतांचे अभिवाचन होणार आहे.नव्या पिढीला ख्यातनाम नाटककार विजय तेंडुलकर यांच्या नाटकांची, त्यातील वैशिष्टय़पूर्ण पात्रांची ओळख व्हावी याकरिता त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय येथे आज सायंकाळी ६ वाजता ‘तें’च्या नाटकातील स्वगते’ हा अभिवाचनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. पॉप्युलर प्रकाशन आणि आविष्कार या नाटय़संस्थेचे कलावंत तेंडुलकरांच्या नाटकांतील काही निवडक प्रवेशांचे अभिवाचन सादर करणार आहेत. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे.
‘शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकातील बेणारे बाईंचं गाजलेलं स्वगत अभिनेत्री मानसी कुलकर्णी, ‘सखाराम बाईंडर’, ‘सौभाग्यवती’ अभिनेत्री चिन्मयी सुमित, अभिनेता सुनील जोशी ‘सखाराम बाईंडर’मधील ‘सखाराम’ वाचणार आहेत, तर ‘अशी पाखरे येती’ मधला अरुण सरनाईक आणि ‘बेबी’ नाटकातला राघव अभिनेता सुशील इनामदार सादर करणार आहेत आणि दीपक राजाध्यक्ष जयंत पवार यांनी तेंडुलकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लिहिलेल्या लेखाचं अभिवाचन करणार आहेत.
तेंडुलकरांच्या नाटकातील पात्रांच्या वैशिष्टय़ांविषयी अभिनेता सुशील इनामदार सांगतात की, त्यांच्या पात्रांमध्ये कोणीही खलनायक पात्र नव्हतं. त्याचं म्हणणं होतं की, मुळात कोणी खलनायक वगैरे नसतो, तर आजूबाजूची परिस्थिती व्यक्तीला कारणीभूत असते. तेंडुलकरांच्या नाटकातली पात्रंही अशीच आहेत. जी वास्तववादी असून आपल्या आजूबाजूला घडणाऱया रोजच्या घटनांतील आहेत. त्यामुळे ती आपल्यातीलच वाटतात. आपल्यामधला एखादा अरुण प्रेक्षकांसमोर येऊन उभा राहतो आणि त्यांना आरसा दाखवतो. अशा व्यक्तिरेखा तेंडुलकरांच्या नाटकात पाहायला मिळतात. त्यामुळे अतिशय साध्या पद्धतीने, पण परिणामकारक अभिवाचन करण्याकडे आमचा कल असणार आहे. शिवाय त्यांचं लिखाणच एवढं उत्कृष्ट आहे की, त्याला कशाचीच जोड द्यावी असे वाटत नाही.
स्वगतांचं अनोखेपण…
विजय तेंडुलकर यांची नाटकं आणि त्यातील पात्रं रोजच्या जगण्याशी साधर्म्य साधणारी आहेत. काळाचं बंधन नसणारी असून आजही ती पात्रं जिवंत वाटतात. अभिवाचनामुळे संपूर्ण नाटक प्रेक्षकांपुढे उभे राहतं. वेळेचं बंधन आणि परिणामकारकरीत्या नाटक रसिकांपर्यंत पोहोचावं यासाठी स्वगतांची निवड केली आहे. स्वगतांमध्ये नाटकांचं सार किंवा पात्राला काय म्हणायचं आहे त्याचा आशय श्रोत्यांपर्यंत लवकर पोहोचवता येतो. शिवाय वेगवेगळ्या पात्रांची स्वगतं या अभिवाचनात सादर केली जाणार आहेत. मानवी नात्यांची गुंतागुंत, आधुनिक समाज व्यवस्थेवर त्यांनी केलेली टिप्पणी यावर आधारित विजय तेंडुलकरांच्या नाटकांतील व्यक्तिरेखा असल्यामुळे त्या परिणामकारक आहेत.




























































