महाराष्ट्र उडता पंजाब होतोय; गोरेगाव ड्रग्स प्रकरणावरून विजय वडेट्टीवार महायुती सरकारवर बरसले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील एका प्रदर्शन केंद्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. ही महाराष्ट्रातील तरुणाईला उद्ध्वस्त करण्याची भयानक सुरुवात आहे. राज्य आज ड्रगमय झाले असून वेळीच आवर घातला नाही तर महाराष्ट्राचा उडता पंजाब व्हायला वेळ लागणार नाही, अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकार आणि पोलीस प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला.

सार्वजनिक कार्यक्रमात उघडपणे अमली पदार्थांचे सेवन केले जाते आणि त्यात तरुणांचा बळी जातो, ही बाब मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे सर्वात मोठे अपयश आहे. आज केवळ शहरातच नव्हे, तर गल्लीबोळात अमली पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी या विळख्यात अडकत चालले आहेत, ही राज्यासाठी धोक्याची घंटा आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थ सेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

पोलीस काही लोकांना पकडतात आणि आर्थिक तडजोडी करून मोठ्या माशांना सोडून देतात, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. राज्यात अमली पदार्थांच्या माध्यमातून करोडो रुपयांची अवैध उलाढाल सुरू असून, यात यंत्रणांचे संगनमत असल्याचा संशय येत आहे. केवळ मुंबईच नाही, तर नागपूरसारख्या शहरातही मोठ्या प्रमाणावर ड्रग्स सापडत आहेत, यावरून हे जाळे संपूर्ण राज्यभर पसरल्याचे स्पष्ट होते, असेही ते म्हणाले.

वडेट्टीवार यांचे रोखठोक सवाल

  • ड्रग्स विक्रेत्यांवर सरकार नेमका कसा आळा घालणार?
  • पोलीस केवळ बघ्याची भूमिका का घेत आहेत?
  • तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे हे रॅकेट मुळापासून उपटून काढण्यासाठी काय ठोस पावले उचलली जाणार?

गोरेगावातील घटना हा केवळ ट्रेलर आहे. जर सरकारने तातडीने कठोर पावले उचलली नाहीत, तर महाराष्ट्रातील तरुणांचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल. गृहमंत्र्यांनी केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्ष कृती करून दाखवावी.

विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते