
रखडलेला विक्रोळीतील नामदेवराव पाटणे मार्ग मेअखेरपर्यंत सुरू होणार आहे. यासाठी नामदेव पाटणे मार्ग व परेश पारकर मार्ग जंक्शन ते रामभजन कंपाऊंड मेअखेरपर्यंत नियमित रेषेत करण्यात येणार आहे. नामदेवराव पाटणे मार्गामुळे परिसरातील हजारो नागरिक, वाहतूकदारांना मोठा फायदा होणार आहे. या मार्गासाठी विक्रोळीतील शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी पाठपुरावा केला.
आमदार सुनील राऊत यांनी आज विभागातील विविध प्रश्नांसदर्भात ‘एन’ वॉर्ड विक्रोळी कार्यालयात पालिका उपायुक्त धोंडे आणि पालिकेच्या अधिकाऱयांसोबत बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या. कन्नमवार नगर व टागोर नगर येथील मलनिस्सारण लाइन व जलवाहिन्या हस्तांतरण म्हाडाने पालिकेकडे केले असून 50 टक्के रक्कम भरण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती उपायुक्त धोंडे यांनी दिली. तर नामदेव पाटणे मार्गासह परेश पारकर मार्गाचे काँक्रीटीकरणही लवकरच सुरू करणार असल्याची माहिती पालिका अधिकारी वीर यांनी दिली. तर एलबीएस रोड गांधी नगरजवळ आणि मुलुंड पूर्व ते ऐरोली ब्रीज दरम्यान भूखंडावर रुग्णालयातील घातक कचऱयाची विल्हेवाट लावली जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा प्लांट कायमस्वरूपी बंद करण्याच्या सूचना राऊत यांनी दिल्या. तसेच कन्नमवार नगर नं. 2 अंतर्गत स्वयंभू गणेश मंडिईचा पुनर्विकास लवकरात लवकर करावा, टागोर नगर येथील बंद असणारी विद्युत दाहिनी सुरू करण्याची मागणीही राऊत यांनी केली. या वेळी विक्रोळी पूर्व रेल्वे स्टेशन येथील शौचालय तातडीने बांधण्याच्या सूचना उपआयुक्त धोंडे यांनी संबंधित अधिकाऱयांना दिल्या.
भांडूप पूर्व आणि पश्चिमला जोडणाऱया पुलाचे काम प्रगतीपथावर असल्याचे पालिका अधिकाऱयांकडून सांगण्यात आले. तर गोविंद नगर येथील झोपडय़ांना पर्यायी जागा दिल्यामुळे अनधिपृत झोपडय़ा तोडून लवकरच काम सुरू करण्यात येणार आहे. शिवाय क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालयाचे काम 2028पर्यंत पूर्ण होणार असल्याचे या वेळी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
कांजूर मार्ग येथील महिलांसाठी असलेले हॉस्पिटल 2027पर्यंत पूर्ण होणार असल्याचे कार्यकारी अभियंता योगेश नलावडे यांनी सांगितले. या ठिकाणी ओपीडी सुरू करण्याच्या सूचना आमदार सुनील राऊत यांनी दिल्या. कांजूर व्हिलेज रोडचेही काँक्रिटीकरण कधी करणार, विक्रोळी पूर्व साईनगर ते नामदेवराव पाटणे मार्गाची संयुक्त व्हिजिट घेण्याच्या सूचनाही आमदार राऊत यांनी दिल्या.
























































