विराट पहिल्या स्थानावर कायम, हिंदुस्थानी संघ दुसऱया स्थानावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत घवघवीत यश संपादन केले. कसोटी, टी-20 सह वन डे मालिकाही खिशात घातली. टीम इंडियाने वन डे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकत आयसीसीच्या वन डे रँकिंगमध्ये दुसरे स्थान पटकावले. कर्णधार विराट कोहलीने दोन अर्धशतक झळकावत फलंदाजांच्या वन डे रँकिंगमधील आपले अव्वल स्थान कायम राखले. मात्र फलंदाजांच्या या रँकिंगमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा (तिसरे स्थान) वगळता एकाही हिंदुस्थानी खेळाडूला अव्वल पाचमध्ये स्थान मिळवता आलेले नाही.

…म्हणून बुमराहची घसरण

आयसीसीच्या वन डेतील गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल पाचमध्ये टीम इंडियाचा एकमेव गोलंदाज आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हे त्याचे नाव. मात्र त्याची या रँकिंगमध्ये चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्याने आपल्या विवाह सोहळ्यासाठी इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेमधून माघार घेतली होती. या मालिकेत तो खेळलाच नाही. त्यामुळे तो एक स्थान खाली घसरला आहे. या रँकिंगमध्ये न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट पहिल्या स्थानावर विराजमान आहे.

नवव्या स्थानावर जाडेजा

आयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या रँकिंगमध्ये अव्वल दहामध्ये रवींद्र जाडेजा हा हिंदुस्थानचा एकमेव खेळाडू आहे. तोही नवव्या स्थानावर आहे. बांगलादेशचा शाकीब उल हसन या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर असून इंग्लंडचा बेन स्टोक्स दुसऱया स्थानावर आहे.

संधी गमावली

हिंदुस्थानी क्रिकेट संघाला वन डे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेण्याची संधी होती. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने इंग्लंडला 3-0 अशा फरकाने धूळ चारली असती तर विराट कोहलीची ब्रिगेड आयसीसीच्या वन डे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहचू शकली असती. पण या मालिकेतील दुसरा सामना हिंदुस्थानने गमावला. त्यामुळे हिंदुस्थानला दुसऱया स्थानापर्यंतच मजल मारता आली.

आयसीसी वन डे रँकिंग

अव्वल पाच फलंदाज

विराट कोहली – 857 रेटिंग
बाबर आझम – 837 रेटिंग
रोहित शर्मा – 825 रेटिंग
रॉस टेलर – 801 रेटिंग
अॅरोन फिंच – 791 रेटिंग

अव्वल पाच गोलंदाज

ट्रेंट बोल्ट – 737 रेटिंग
मुजीब उर रहमान – 708 रेटिंग
मॅट हेन्री – 691 रेटिंग
जसप्रीत बुमराह – 690 रेटिंग
मेहेदी हसन – 668 रेटिंग

अव्वल पाच अष्टपैलू

शाकीब अल हसन – 408 रेटिंग
बेन स्टोक्स – 295 रेटिंग
मोहम्मद नाबी – 294 रेटिंग
ख्रिस वोक्स – 273 रेटिंग
इमाद वासीम – 271 रेटिंग

अव्वल पाच देश

इंग्लंड – 121 रेटिंग
हिंदुस्थान – 119 रेटिंग
न्यूझीलंड – 118 रेटिंग
ऑस्ट्रेलिया – 111 रेटिंग
दक्षिण आफ्रिका – 108 रेटिंग