
स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडे नसल्यामुळे सुमारे दहा मृत व्यक्तींचा अखेरचा प्रवास १२ तास वेटिंगवर असल्याचा संतापजनक प्रकार नालासोपाऱ्यात घडला आहे. वसई-विरार पालिकेच्या नालासोपारा, तुलिंज आणि आचोळा स्मशानभूमींमध्ये गेल्या सात दिवसांपासून अंत्यविधीसाठी लाकडेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी कोणी लाकडे द्या हो लाकडे, असा टाहो मृतांच्या नातेवाईकांना फोडावा लागत आहे. अंत्यसंस्कारासाठी दहा ते बारा तास वाट पाहावी लागत असल्याने मृतदेहांची हेळसांड होत आहे.
वसई-विरार महापालिकेच्या जवळपास सर्वच स्मशानभूमींमध्ये लाकडांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी मृतदेहांची रांग लागत आहे. नालासोपारा पूर्व परिसरातील जवळपास दहा मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या नातेवाईकांना समेळपाडा येथील स्मशानभूमीत सकाळपासून रांगेत थांबावे लागले. इतका वेळ पार्थिव घरात ठेवावे लागल्यामुळे शोकाकुल झालेल्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अंत्यविधीसाठी ताटकळत थांबावे लागत असल्याने वसई-विरार पालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
- स्मशानभूमीत लाकडे नसल्यामुळे मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना स्वतः लाकडांची व्यवस्था करावी लागत आहे. अनेक नागरिक हातगाड्यांवर लाकडे घेऊन येत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.
- शिरीष जुवेकर यांच्या ७० वर्षीय आईचे रविवारी सकाळी ७ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. शिरीष हे मूकबधिर असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत संपर्क साधला असता त्यांना संध्याकाळी ७ वाजता या, असे सांगण्यात आले.
- जुवेकर यांच्या अगोदर सुमारे दहा मृतदेह या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रांगेत होते. त्यामुळे जुवेकर यांना आपल्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी दिवसभर ताटकळत थांबावे लागले.
दोषींवर कारवाई करा
महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या हल गर्जीपणामुळे शहरात सध्या मृतदेहांची हेळसांड सुरू आहे. अंत्यविधीसाठी लाकडे उपब्ध करून देण्यास प्रशासनाने प्राधान्य देणे आवश्यक होते. मात्र दुर्दैवाने तसे घडले नाही. याप्रकरणी संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांची कसून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख प्रणब खामकर आणि शाखाप्रमुख हितेश घरत यांनी केली आहे.





























































