
>> स्पायडरमॅन
जगात इतक्या चित्रविचित्र घटना घडत असतात की काय सांगावे! विविध धर्म आणि संस्कृतींनी नटलेल्या आपल्या हिंदुस्थानात तर वेगवेगळ्या प्रथा, परंपरा आणि अशा विचित्र घटनांची काही कमतरता नाही. अशीच एक थक्क करणारी घटना नुकतीच मध्य प्रदेशात घडली आहे. इथे कुलदैवत अथवा शेतीचा देव म्हणून धार व आसपासच्या गावांतील शेतकरी काही गोल आकाराच्या वस्तूंची पूजा वर्षानुवर्षे करत आले आहेत. त्या वस्तू म्हणजे चक्क डायनासोरची अंडी असल्याचे संशोधकांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे.
झाले असे की, धार आणि आसपासच्या क्षेत्रात यापूर्वीदेखील डायनासोरच्या अंडय़ाचे फॉसिल मिळालेले आहे. त्यामुळे संशोधक अधेमधे या भागाला भेट देत असतात आणि आपले संशोधन चालू ठेवत असतात. अशाच एका संशोधनासाठी लखनौच्या बिरबल साहनी पुरातत्व महाविद्यालयाच्या संशोधकांची एक टीम धार जिह्यातील बाग या आदिवासीबहुल गावात आली होती. इथले आदिवासी शेतीदेखील करतात. काकर भैरव या देवतेची ते कुलदैवत म्हणून पूजा करतात. हा देव त्यांच्या शेताची, पशुधनाची काळजी घेतो, भरभराट आणतो अशी त्यांची श्रद्धा आहे. त्या देवतेचे स्वरूप म्हणून ते काही गोल वस्तूंची अनेक वर्षे पूजा करीत आहेत.
जेव्हा संशोधकांची टीम या छोटय़ा गावात पोहोचली तेव्हा त्यांना याबद्दल माहिती मिळाली. उत्सुकतेपोटी जेव्हा त्यांनी या पुजल्या जाणाऱया वस्तूंचे निरीक्षण केले तेव्हा ते थक्क झाले. अर्थात, अज्ञानापोटी का असेना, पण गेली कित्येक वर्षे हे भाविक या अंडय़ांना पुजत होते आणि त्यामुळे एक प्रकारे अत्यंत महत्त्वाच्या अशा पुरातन वस्तूचे संरक्षणच झाले आहे. यानंतर संशोधकांनी आजूबाजूच्या काही गावांचेदेखील दौरे केले आणि तिथे काही ठिकाणी हीच परंपरा चालू असल्याचे दिसले आणि तिथूनदेखील काही अंडी संरक्षित करण्यात आली. या वेळी वन विभागाची टीमदेखील तिथे हजर होती. आता वन विभागानेदेखील या अंडय़ाच्या संरक्षणासाठी विशेष काळजी घेणार असल्याचे जाहीर केले आहे.






























































