ऐन लग्नसराईत लाखमोलाचे सोने!

सातत्याने वाढणारा सोन्याचा भाव ऐन लग्नसराईत लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे. सध्या सोन्याचा प्रतितोळा दर 73 हजारांवर पोहोचला आहे. मात्र सध्या जागतिक पातळीवर घडणाऱया घडामोडींमुळे सोन्याचे दर आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. इस्रायल-इराण युद्धाची स्थिती तसेच अन्य काही कारणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे दर चढेच राहिल्यास आगामी वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांत सोन्याचा दर हा एक लाख रुपये प्रति 10 ग्रॅम होऊ शकतो. तसेच सोन्यासह चांदीचा दरदेखील एक लाख रुपये प्रतिकिलो होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी सोने प्रतितोळा (10 ग्रॅम) 73 हजार 174 हजार रुपयांपर्यंत पोहोचले. सध्या लग्नसराई सुरू असून लोक सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करीत आहेत. आगामी काळात सोने आणखी भाव खाण्याची शक्यता आहे. चांदीचीही हीच स्थिती आहे. चांदीचा दर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असून चांदीचा दर सध्या 83819 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. इराण – इस्रायल यांच्यातील तणावामुळेदेखील सोने-चांदीचा भाव भविष्यात वाढण्याची शक्यता आहे.

गोल्डमॅन सॅक्स या संस्थेच्या म्हणण्यानुसार जागतिक बाजारात सोन्याचा भाव या वर्षाच्या शेवटपर्यंत 2,700 डॉलर प्रति औंसपर्यंत वाढू शकतो. काही दिवसांपर्वी हाच दर 2,300 डॉलर्सपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
सध्या जागतिक बाजारात सोन्याचा दर 2,424.32 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचला आहे, तर चांदीचा दर हा 29.60 डॉलर प्रति औंस झाला असून तो 2021 सालानंतरचा सर्वाधिक दर आहे.

मागणी वाढली
अमेरिकेच्या खजिन्यात 8133 टन, जर्मनी 3353 टन, इटलीकडे 2452 टन, फ्रान्सकडे 2437 टन, रशियाकडे 2333 टन, स्वित्झर्लंडकडे 1040 टन, हिंदुस्थानकडे 801 टन, जपानकडे 847 टन, नेदरलँड 612 टन, चीन 2245 टन तुर्कस्थान 440 टन तर तैवानकडे 424 टन इतके सोने आहे. सोन्याला झळाळी येण्यामागे चीन कारणीभूत आहे. ऑक्टोबर 2022 च्या तुलनेत चीनच्या साठय़ात तब्बल 300 टनांची वाढ झाली आहे. चीनच्या मध्यवर्ती बँकेसोबतच चीनचे नागरिकही मोठय़ा प्रमाणावर सोने खरेदी करत आहेत. चीनची शेअर बाजार आणि मालमत्ता विभागाची अवस्था अत्यंत खराब आहे. त्यामुळे चीनी लोक सोन्यात प्रचंड गुंतवणूक करत आहेत. परिणामी, जागतिक स्तरावर सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

24 वर्षात 600 टक्क्यांनी वाढ
24 वर्षात सोन्याच्या दरात तब्बल 600 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे समोर आले आहे. शेअर बाजारातील पडझडीमुळे गुंतवणूकदारांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली. परिणामी, सोन्यामध्ये गुंतवणूक वाढली असून सोन्याच्या मागणीतही मोठी वाढ झाली. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत गेल्याचे अर्थतज्ञांनी सांगितले.