
विमा संरक्षण ही आजच्या जगातली अत्यंत गरजेची गोष्ट आहे. पण, आपण जेव्हा विमा हा शब्द उच्चारतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर अपघात, आरोग्य, पर्यटन, मृत्यू असे शब्द येतात. कारण, विमा हा शब्द नुकसान भरपाईशी जोडलेला आहे. पण, या जगात असेही काही विचित्र विमा आहेत, ज्यांचा तुम्ही विचारही करू शकत नाही.
चेंज ऑफ हार्ट किंवा कोल्ड फीट विमा
लग्नात कधीकधी नवरा मुलगा किंवा मुलगी पळून जाते. ऐन लग्नात सगळ्या कार्यक्रमाचा विचका होतो. भांडणं, वाद विकोपाला जाऊ शकतात. अर्थात या घटनेनंतर होणारं मानसिक नुकसान तर भरून येत नाही. पण, त्याची नुकसानभरपाई नक्की मिळू शकते. या विम्याला चेंज ऑफ हार्ट किंवा कोल्ड फीट विमा म्हटलं जातं. जर ऐन लग्नात तुमचा होणारा नवरा किंवा बायको तुम्हाला सोडून गेली, तर तुम्हाला त्याचं विमा संरक्षण मिळू शकतं. पण, यात तुम्हाला ऐन लग्नाची मुभा असेलच असं नाही. काही वेळा एक वर्षं आधी जर लग्न मोडलं तरच ही रक्कम मिळते.
एलियनने अपहरण केल्यास विमा
शीर्षक वाचून दचकू नका. पण, 2019मध्ये प्रकाशित एका अहवाला नुसार लंडनच्या एका विमा कंपनीने एलियनच्या अपहरणापासून संरक्षण देणारा विमा देऊ केला होता. इतकंच नव्हे तर 30 हजारहून अधिक विमा विकले देखील आहेत. याची अट अशी होती की, तुम्हाला तुमच्या आसपास एलियनच्या उपस्थितीचे पुरावे द्यावे लागतील. विशेष म्हणजे 20 हजारहून अधिक लोकांनी हा विमा खरेदी केला होता.
लावसट किंवा झॉम्बीच्या हल्ल्यापासून विमा संरक्षण
या जगात अनेक लोक असेही आहेत जे लावसट, झॉम्बी अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात. त्यामुळे जगातील काहींनी झॉम्बीच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठीचा विमा उतरवला आहे. या खेरीज भुतामुळे होणारं नुकसान किंवा मृत्युसाठी देखील विमा मिळू शकतो.
डोक्यावर नारळ पडल्यास देखील विमा उपलब्ध आहे. हा विमा 2002पासून उपलब्ध आहे. तसंच, स्वरयंत्र आणि शारीरिक अवयवांचाही विमा उतरवता येतो. अनेक सेलिब्रिटींनी आजवर आपल्या अवयवांचे विमा उतरवले आहेत.




























































