
सामना ऑनलाईन । जयपूर
कोणाला कसला राग येईल काही सांगता येत नाही. बायको भाजीवाल्याशी बोलत असल्याचा आणि भाजीवाला स्मितहास्य करत असल्याच्या राग राजस्थानातील एका माणसाला आला. त्याने रागाच्याभरात त्या भाजीवाल्याची हत्या केल्याची घटना घडली आहे.
भाजीविक्रेत्याचा आवाज ऐकून एक महिला घराबाहेर आली. ती भाजी बघत त्याच्याशी बोलायला लागली. भाजीवालाही स्मितहास्य करत तिच्याशी बोलत होता. महिलेच्या पतीने ही घटना पाहिली. या घटनेने त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो तलवार घेऊन घराबाहेर आला आणि तलवारीचे वार करत भाजीवाल्याची खांडोळी केली. भाजीवाल्याच्या गळ्यावर तलवारीने वार करत त्याने त्याचे डोके धडापासून वेगळे केले. राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील एका गावात ही खळबळजनक घटना घडली आहे.
राजसमंद जिल्ह्यातील एका गावात लक्ष्मण सिंह हा भाजीवाला नैना सिंह यांच्या घरासमोर आला. त्याने आवाज दिल्यावर नैना यांची पत्नी घराबाहेर आली. भाजीवाल्याशी तिचा संवाद सुरू असतानाच नैनाने भाजीवाल्यावर वार करत त्याला ठार केले. पोलिसांनी याप्रकरणी नैना सिंहला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. आरोपी नैना सिंह संशयीवृत्तीचा असल्याचे सांगण्यात आले. भाजीवाल्याने पत्नीशी बोलणे आणि स्मितहास्य करणे त्याला आवडले नाही. कोणताही माणूस घरी आल्यावर तो त्याच्याकडे संशयाने पाहत असे. त्याने पत्नीला कोणत्याही पुरुषासमोर जाण्यास मनाई केली होती. पत्नी घराबाहेर पडल्यास त्याची चिडचिड होत असे. त्यामुळे गावातील सगळे त्याच्यापासून दूर राहत होते. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून आरोपीची मानसिक तपासणीही करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.





























































