शिवरायांचा भगवा लोकसभेवर फडकवायचा आहे, उद्धव ठाकरे यांचा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नाशिक

आगामी निवडणुकीत विजयी झाल्याशिवाय विश्रांती घ्यायची नाही, लोकसभेवर आता शिवरायांचा भगवा फडकावायचा आहे असा निर्धार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. नाशिकमध्ये शिवसेना भाजप युतीच्या संयुक्त कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुका जिंकायचा असा निर्धार करत त्यांनी विरोधी पक्षांवर चांगलीच तोफ डागली.

युतीच्या घोषणा होत आहेत याचा मला आनंद होत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. तसेच शिवसेना भाजप युतीसाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली आहे, ज्यांनी रक्त सांडले आहे, त्याचे कार्य वाया जाऊ द्यायचे नाही असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

शिवसेना भाजप युती ही देव, देश आणि धर्मासाठी झाल्याचे त्यांनी सांगितले तसेच पक्ष हा विचारांनी बनतो ना की गोळा केलेल्या माणसांवर असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “पवारांनी नेहमी स्वतःच्या मुलांचे लाड केले, परंतु त्यांना दुसर्‍यांच्या मुलांचे गुण दिसले नाही.”

शिवसेना भाजप मतभेदावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “हो आमच्या वाद होते, परंतु नरेंद्र भाईंच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे. आधी 22 पक्षांनी हम साथ साथ है च्या घोषणा दिल्या. पाठ वळताच हम आपके है कौन म्हणायले लागले. विरोधी पक्षांनी आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करावा. आधीच्या सरकारने पाकिस्तानाला त्यांच्या भाषेत उत्तर दिले नाही. केंद्र सरकारने जेव्हा आता दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले तेव्हा विरोधी पक्षाने त्याचे पुरावे मागितले.” हा त्यांनी केलेला शहिदांचा अपमान असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. तसेच आता पाकिस्तानवर फक्त सर्जिकल स्ट्राईक नको तर त्यांच्या चिंधड चिंधड्या उडवा असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

भुकेल्याला अन्न देणे, गरीबांना घर देणे हा गाडगेबाबांनी सांगितलेला मानव धर्म हाच धर्म आम्ही पाळत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. आमची युती ही खुर्चीसाठी नाही, परंतु देशाच्या संरक्षणासाठी आणि देश बलवानासाठी खुर्ची हवी असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. भाषणाच्या शेवटी हा शिवरायांच्या भगवा आहे तो लोकसभेवर फडकावणारच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.