धक्कादायक! प्रसूतीनंतर समजले की ती गरोदर आहे

नेहमीप्रमाणे तिची दैनंदिन कामं सुरू होती. घरातलं आवरत असताना अचानक तिच्या पोटात दुखू लागलं. सुरुवातीला हलक्या वाटणाऱ्या कळा काही वेळाने असह्य होऊ लागल्या. तिला काय होतंय हे कळेना. पण आपल्या शरीरातून काहीतरी बाहेर पडतंय हे तिला जाणवलं व ती हादरली. सुरुवातीला वाटलं मोठा मुतखडा असेल, नंतर वाटलं की शरीरातील एखादा अवयव तुटून बाहेर पडतोय. कारण तोपर्यंत तिला कल्पनाच नव्हती की ती नवव्या महिन्याची गरोदर आहे. आणि काही वेळातच तिच्या हातात एक गोंडस बाळ होतं. आई होणं ही जगातली सर्वात सुंदर गोष्ट मानली जाते मात्र या महिलेसाठी तो तिच्यासाठी तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का होता.

मेलिसा सर्जकॉफ असे त्या महिलेचे नाव असून ती अमेरिकेतील मॅसॅच्युसेट येथे राहते. 8 मार्चला तिची प्रसूती झाली. मात्र तोपर्यंत तिला ती गरोदर असल्याचेच माहित नव्हते. नुकतंच तीने मॅसॅच्य़ुसेटच्या स्थानिक वाहिनीला मुलाखत दिली. त्यात तिने तिचा अनुभव सांगितला. ‘मला नऊ महिन्यात एकदाही मी गरोदर असल्याचे जाणवले नाही. नवव्या महिन्यात देखील माझे पोट पुढे आलेले नव्हते. फक्त वजन वाढत होते. मला वाटले मल्टीपल स्क्लेरोसिस या आजाराच्या गोळ्यांमुळे माझे वजन वाढत आहे. या आजारात वजन वाढणे हे सामान्य आहे. पण जेव्हा माझी प्रसूती झाली तेव्हा मला धक्काच बसला. माझा नवरा देखील शॉकमध्ये होता. पण नंतर आम्ही आनंदाने आमच्या बाळाला स्वीकारलं, असं मेलिसा व तिच्या नवऱ्याने या मुलाखतीत सांगितलं.

गेल्या वर्षी ब्राझिलमध्ये एका 20 वर्षीय महिलेने बाथरुममध्ये बाळाला जन्म दिला होता. त्या महिलेला देखील मेलिसाप्रमाणेच प्रसूती होईपर्यंत ती गरोदर असल्याचे माहित नव्हते. तर वेस्ट ससेक्स येथील एका महिलेला 37 आठवडे झाल्यानंतर तिला ती गरोदर असल्याचे समजले. तोपर्यंत तिने बऱ्याच गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या होत्या. तसेच तिला मासिक पाळी देखील येत होती.

आपली प्रतिक्रिया द्या