
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सध्या ऑस्ट्रेलियन महिला संघाचा विजयरथ सध्या चौफेर उधळतोय. न्यूझीलंडचा दुसऱया लढतीत 71 धावांनी पराभव करुन ऑस्ट्रेलियाने सलग 23 व्या विजयाला गवसणी घालण्याचा पराक्रम केला. अर्धशतकी खेळी करणारी सलामीची फलंदाज रचेल हेन्स ही या सामन्याची मानकरी ठरली. आता उभय देशांमधील तिसरा सामना शनिवारी रंगणार आहे.
ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या 272 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 45 षटकांत 200 धावांवरच गारद झाला. त्यांच्याकडून अमेलिया कीर (47), ब्रुक हॅलिडे (32), हेली जेन्सन (28) यांनीच काय तो ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा काही वेळ प्रतिकार केला. ऑस्ट्रेलियाकडून जेस जॉनासनने 3, तर जॉर्जिया वेअरहॅम हिने 2 फलंदाज बाद केले.
दरम्यान, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 7 बाद 271 धावसंख्या उभारली. यात सलामीवीर रचेल हेन्स हिने सर्वाधिक 87 धावांची खेळी केली. एलिसा हेली (44) व कर्णधार मेग लॅनिंग (49) यांनी उपयुक्त फलंदाजी केली. न्यूझीलंडकडून लेह पॅस्परेकने 6 फलंदाजांना तंबूत धाडले, तर एमी सॅटर्थवेट हिने 1 बळी मिळवला.




























































