Lok Sabha Election 2024 : जेवणासाठी मतदान थांबविले, अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

>> प्रसाद नायगावकर

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिल रोजी मतदान पार पडले. महाराष्ट्रात 8 मतदारसंघामध्ये लोकांनी उत्फुर्तपणे मतदान केले. मात्र यवतमाळ-वाशिम मतदारसंघामध्ये मतदान केंद्रावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जेवणावळीमुळे मतदारांना ताटकळत बसावे लागले. याची दखल निवडणूक विभागानेही घेतली असून संबंधित मतदान केंद्रावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील हिवरी येथे निवडणुकीची प्रक्रिया थांबवून मतदान केंद्रावरील अधिकारी मतदान कक्षामध्ये जेवायला बसले. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर भर उन्हामध्ये मतदारांना तब्बल 25 मिनिटे उभे रहावे लागले. यामुळे मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याचे वृत्तही माध्यमातून झळकले. त्यानंतर आता निवडणूक विभागानेही याची दखल घेतली असून या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांनी हिवरी मतदान केंद्रप्रमुखांकडे संबंधित प्रकाराबाबत खुलासा मागितला आहे.

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी मतदान प्रक्रिया थांबवून जेवणे करणे आणि मतदारांना ताटकळत ठेवणे गंभीर असल्याचे म्हटले. तर काही नेटकऱ्यांनी कर्मचाऱ्यांचीही बाजू घेतली आहे. मतदानाच्या आदल्या दिवशीपासून राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने थोडा वेळ जेवणासाठीही द्यावा अशी मागणी केली आहे.