मनपाचे गोलमाल बजेट, नगरकरांची घोर निराशा; काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काळे यांची टीका

मीटरने पाणीपुरवठा, उपनगरात भुयारी गटार योजनेचे काम, सीएसआर निधीतून कामे यासह करवाढ न करता मनपाने बजेट जाहीर केले आहे. यावर ‘मनपाचे बजेट हे गोलमाल बजेट असून, सर्वसामान्य नगरकरांची घोर निराशा करणारे आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. दरम्यान, 1560 कोटींचे पोकळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. नगरकरांवर 150 कोटींच्या कर्जाचा बोजा टाकण्याचा घाट बजेटच्या आडून घातला गेल्याचा आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला.

मनपावर प्रशासकराज असले तरी सत्ताधारी सरकारचा आणि त्याच्या स्थानिक प्रतिनिधींचा मनपा प्रशासनावर पूर्ण प्रभाव आहे. ‘राजा बोले, दल हाले’, अशी स्थिती मनपात आहे. नगरकरांचे प्रश्न सोडविणे, मूलभूत सोयी-सुविधा पुरविणे ही कामे मनपा करत नसून, ठेकेदार पोसणे, भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणे ही कामे होत आहेत. मनपा ही रिमोट कंट्रोलवर चालते, अशा टीका काळे यांनी मनपाच्या बजेटवर केली आहे.

शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आजही आठ-आठ दिवस पाणी येत नाही. मुळात तुम्ही पाणीच 365 दिवस, मुबलक आणि स्वच्छ देऊ शकत नाही, तर मीटर काय बसवत आहात? असा सवाल काळे यांनी केला आहे. दुसरीकडे ड्रोनद्वारे मालमत्तांचे सर्वेक्षण करून मालमत्ताकराची पुन्हा आकारणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुळात अशा छुप्या पद्धतीने करवाढ करण्याचा कोणताही नैतिक अधिकारच मनपाला नाही. हा नगरकरांच्या लुटीचा डाव आखला आहे, असे काळे म्हणाले.

मनपात 200 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा भ्रष्टाचार

नगर शहरातील सुमारे 778 रस्त्यांच्या कामांमध्ये सुमारे 200 कोटींहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार अधिकारी, ठेकेदार, पुढारी यांच्या संगनमतातून झाला आहे. त्याची फिर्याद काँग्रेसच्या वतीने ऍण्टीकरप्शनकडे दिली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. भ्रष्टाचार करायचा, नगरकारांना लुटायचे आणि दुसरीकडे मनपा हिस्सा भरण्यासाठी कोटय़वधींचे कर्ज काढायचे हे चुकीचे धोरण असल्याचे काळे यांनी म्हटले आहे. दरम्यान, नगरकरांना कर्जबाजारी करण्यापेक्षा भ्रष्टाचार करू नका, असा सल्ला काळे यांनी दिला आहे.