अक्षय तृतीयेला आंबा महागच, एक नग हापूस 100 ते 150 रुपयांना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर हापूस आंब्यांना मागणी वाढली वाढली असली, तरी अवकाळी पाऊस आणि तापमानातील चढ-उतारामुळे उत्पादन घटल्याने आंब्यांचे दर गगनाला भिडले आहेत. किरकोळ बाजारात एक डझन आंब्याची विक्री १२०० ते १८०० रुपयांपर्यंत केली जात आहे. यानुसार एका आंब्यासाठी ग्राहकांना दर हा १०० ते १५० रूपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे अक्षय तृतीयेला आंबा महागच आहे.

नोव्हेंबर-डिसेंबरमधील अवकाळी पावसाने हंगामाची सुरुवातच विस्कळीत केली. सुरुवातीला मोहोर चांगला आला; मात्र फेब्रुवारीत दिवसा कडक ऊन आणि रात्री गारव्यामुळे दुसर्‍या बहरातील मोहोर मोठ्या प्रमाणावर गळाला. मार्चमध्ये आवक काहीशी सुधारली असली तरी एप्रिलमध्ये अपेक्षित वाढ न होता उलट घट झाल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्वेâटयार्ड फळबाजारात दरवर्षी एप्रिलमध्ये ८ ते १० हजार पेट्यांची आवक होत असताना यंदा ती केवळ १ ते दीड हजार पेट्यांवर घसरली आहे. मागणी मात्र कायम असल्याने बाजारातील तफावत वाढली आहे.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याला धार्मिक महत्त्व असल्याने मार्वेâटयार्डात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली असून, शनिवार आणि रविवारी खरेदीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोकणातील जयगड, देवगड, शिरगाव, पावस आणि जैतापूर परिसरातून होणारी आवक गेल्या तीन दशकांत प्रथमच एवढ्या प्रमाणात घटल्याचे चित्र आहे.

२० एप्रिलनंतर हापूसची आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर आंब्याच्या भावात काहीशी घसरण होऊ शकते. मात्र सध्या तरी आवक कमी, मागणी जास्त या समीकरणामुळे अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच राहणार आहे.
– बाळासाहेब कोंडे, विभाग प्रमुख, बाजार समिती, पुणे.

घाऊक बाजारातील हापूसचे भाव

– ४ ते ७ डझन पेटी (कच्चा) २००० ते ३५०० रुपये
– ५ ते १० डझन पेटी (कच्चा) ३००० ते ४५०० रूपये