
अष्टविनायक निर्मित, प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘संज्या छाया’ या नाटकाचा शतकमहोत्सवी प्रयोग येत्या 27 नोव्हेंबर रोजी विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात दुपारी 4 वाजता होणार आहे. यावेळी ‘संज्या छाया’ नाटकाचा पुस्तक प्रकाशन सोहळाही अनोख्या पद्धतीने होणार आहे. पॉप्युलर प्रकाशनतर्फे प्रकाशित होणारे प्रशांत दळवींचे हे सहावे नाटक आहे.
वैभव मांगले आणि निर्मिती सावंत यांच्या अभिनयाची जुगलबंदी या नाटकात प्रेक्षकांना अनुभवायला मिळतेय. त्यांच्या साथीला सुनील अभ्यंकर, योगिनी चौक- बोऱहाडे, अभय जोशी, आशीर्वाद मराठे, मोहन साटम, संदीप जाधव, राजस सुळे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका नाटकात आहेत. आजच्या तणावपूर्ण जीवनात आनंदी जगण्याचा मंत्र हे नाटक प्रेक्षकांना हसतखेळत देत आहे. एखाद्या चांगल्या कामात स्वतःला गुंतवून घेतलं तर आयुष्यातील अनके छोटे-मोठे प्रश्न कसे सहज सुटू शकतात हे अत्यंत रंजक पद्धतीने नाटकात सांगितले आहे.




























































