
मुंबईतील विलेपार्ले परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. बहिण आणि तिच्या पतीमधील घरगुती वाद सोडवायला गेलेल्या मेव्हण्याची भावोजीने चाकूने वार करून हत्या केली. विलेपार्लेतील शास्त्री नगर परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली. सागर गुप्ता (24) असे मयत तरुणाचे नाव आहे.
सागर कुटुंबासह शास्त्री नगरमध्ये राहतो. त्याची विवाहित बहीण देखील तिचा पती आकाश मौर्यसोबत त्याच परिसरात राहते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सागर बहिणीच्या घरी गेला. तेथे जेवणाच्या क्षुल्लक कारणातून पती-पत्नीमध्ये वाद झाला.
सागरने बहिण आणि भावोजीच्या भांडणात मध्यस्थी करण्याचा आणि परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी अधिक आक्रमक झाला आणि त्याने सागरच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात सागरला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी सागरच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिसात आकाशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळ पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या (बीएनएस) संबंधित कलमांखाली हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील दळवी यांच्या निरीक्षणाखाली पुढील तपास सुरू आहे.
























































