
पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची भररस्त्यात बेदम मारहाण करत हत्या केल्याची घटना मुंबईतील दादर परिसरात घडली. अंकुश आंबोकर (40) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, अंकुशचा बेंजोचा व्यवसाय होता तर त्याची पत्नी सिद्धीविनायक मंदिरात सुरक्षारक्षकाचे काम करते. रविवारी रात्री अंकुश मित्राला भेटायला जात असताना मुख्य आरोपी गौरव सणसने त्याला रस्त्यातच गाठले. गौरव आणि त्याच्या साथीदारांनी अंकुशला रस्त्यातच शिवीगाळ करत मारहाण केली. अंकुशच्या पत्नीला माहिती मिळताच तिनेही घटनास्थळी धाव घेत पतीचा बचाव करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. वाढती गर्दी पाहून आरोपींनी तेथून पळ काढला.
जखमी अवस्थेत अंकुशला तात्काळ केईएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी अंकुशच्या पत्नीच्या फिर्यादीवरून दादर पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
अंकुश आणि गौरव दोघेही एकत्र बेंजोचा व्यवसाय करत होते. मात्र काही त्यांच्यात वाद झाल्याने 2017 पासून दोघे वेगळे झाले. यानंतर अंकुशने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. याचा राग मनात धरून गौरव सतत अंकुशला धमकवायचा. याबाबत अनेकदा पोलिसात तक्रारीही करण्यात आल्या होत्या.























































