
आरती आर्ट अकादमी (मुंबई), वेताळ प्रतिष्ठान (वेंगुर्ले), अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद व संशोधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तिसरे दशावतारी नाट्यसंमेलन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 20 ते 21 एप्रिल या कालावधीत बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहातील जयवंत दळवी लघु नाट्यगृहात हा सोहळा पार पडणार आहे. दरम्यान अॅड. डॉ. अशोक भाईडकर लिखित ‘दशावतार’ या महाग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचेदेखील प्रकाशन करण्यात येणार आहे.
20 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता महाराष्ट्राचे सांस्पृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांच्या हस्ते या नाट्यसंमेलनाची सुरुवात होणार आहे. उद्घाटनावेळी अॅड. डॉ. अशोक भाईडकर यांच्या ‘दि ग्रेट इंडियन फोक ड्रामा : दशावतार’ या इंग्रजी पुस्तकाचेही प्रकाशन केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाचे ‘कलादान’ पुरस्कार विजेते ज्येष्ठ दशावतारी रंगकर्मी यशवंत तेंडोलकर हे या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार असून मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, वेताळ प्रतिष्ठानचे डॉ. सचिन परुळेकर आणि प्रसिद्ध नाट्य-चित्रपट अभिनेते प्रदीप विजया राधापृष्ण कबरे हे सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवस रसिकांसाठी मोफत नाट्यप्रयोग
दोनदिवसीय संमेलनात रसिकांसाठी दशावतारी नाट्यप्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 20 एप्रिल रोजी ‘मृत्युंजय महात्म्य’ आणि 21 एप्रिल रोजी ‘गोपुळचा चोर’ हे दोन प्रयोग सादर केले जातील. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड प्रायोजित हे दोन्ही प्रयोग सर्व रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक अॅड. डॉ. अशोक भाईडकर व प्रदीप कबरे यांनी केले आहे.





























































