वेतन रखडले, शिक्षक अतिरिक्त, मागण्या जैसे थे; शिक्षकांचे प्रश्न सोडवा! उद्या राज्यभरात शिक्षकांचा एल्गार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील हजारो शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनदेखील वेतन रखडणे, शिक्षक अतिरिक्त ठरवण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे शिक्षकांवर प्रचंड अन्याय होत आहे. याविरोधात शिक्षकांच्या असंतोषाचा भडका आता उडाला असून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. 16 एप्रिल रोजी राज्यभरात आंदोलन केले जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी याबाबत शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांना निवेदन दिले आहे. यामध्ये शिक्षकांचे विविध प्रश्न मांडण्यात आले आहेत. या मागण्या तातडीने पूर्ण करा अशी मागणी त्यांनी केली आहे. यामध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे थांबवलेले वेतन तातडीने द्यावे, संच मान्यता सुधारावी, राज्यातील शिक्षकांची गेल्या 2 ते 6 वर्षांपासून थकीत देयके अदा करावीत, शाळा बंद होईल अशी भिती दाखवून शिक्षकांवर बीएलओचे अतिरिक्त काम लादू नये, नियोजित पटपडताळणीचा कार्यक्रम रद्द करावा सप्टेंबर ते डिसेंबर, 2026 मध्ये पटपडताळणीचे आवश्यकतेनुसार नियोजन करावे, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्याची माहिती शिक्षक सेना मुंबई पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष हितेंद्र चौधरी यांनी दिली आहे.

असे होणार आंदोलन

मुंबई पश्चिम विभाग शिक्षण निरीक्षक कार्यालयाबाहेर प्रशासनाविरुद्ध आंदोलन करण्यात येणार आहे. गुरुवार 16 एप्रिल रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, मुंबई पश्चिम विभागाकडून शांततापूर्ण लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल. मात्र या आंदोलनाची दखल घेत मागण्या मंजूर केल्या नाहीत तर आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शिक्षक सेनेने दिला आहे.