
तळाला अडकलेल्या संघांमध्ये झालेल्या झटापटीत चेन्नईने कोलकात्याचा पराभव करत पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर आपली धाव सुरू केली तर नव्या हंगामात सलग चौथ्या पराभवाला सामोरे जाण्याची नामुष्की कोलकात्यावर ओढावली. संजू सॅमसनच्या झंझावातानंतर नूर अहमदच्या फिरकीने कोलकात्याच्या फलंदाजांना तंबूची वाट दाखवल्यामुळेच चेन्नईला दुसरा विजय मिळवता आला.
चेन्नईने उभारलेले 193 धावांचे आव्हान अजिंक्य रहाणेची कोलकाता सहज पार पाडेल असे प्रथमदर्शनी भासले असले तरी चेन्नईच्या गोलंदाजांनी ते साध्य होऊ दिले नाही. अंशुल पंबोजने फिन अॅलनला आपल्या पहिल्याच षटकात अवघ्या एका धावेवर बाद करून सनसनाटी निर्माण केली. त्यानंतर सुनील नारायण, अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशीने विशीतल्या धावा काढल्या, पण ते संघाला विजयाचे स्वप्न दाखवू शकले नाही. तिघांनी संघांला शंभरीत नेले, पण एकही फलंदाज आपल्या बॅटचा घणाघात दाखवू शकला नाही.
अहमदने नूर पालटवला
आघाडीच्या तिन्ही फलंदाजांच्या उपयुक्त खेळीमुळे कोलकात्याने आपले विजयाचे प्रयत्न कायम ठेवले होते, पण अजिंक्य आणि अंगकृषच्या 50 धावांच्या भागीदारीला नूरने फोडलेले आणि त्यानंतर कोलकाता धडाधड कोसळला. नूरने आपल्या फिरकीची कमाल दाखवता आधी अजिंक्यची विकेट काढली तर पुढच्याच चेंडूवर कॅमरून ग्रीनलाही हादरा दिला. मग रिंकू सिंहलाही भोपळा न फोडताच बाद करून नूरने सामनाच फिरवला. 2 बाद 79 वरून 6 बाद 90 अशी केविलवाणी अवस्था करून कोलकात्याचा खेळच संपवला. पुढे रोव्हमन पॉवेल आणि रमणदीप सिंगने 63 धावांची फटकेबाजी भागीदारी केली. त्यानंतर कोलकात्याचा संघ विजयाच्या शर्यतीत खूप मागे पडला. अखेर 20 षटकांत 7 बाद 160 धावांवर कोलकात्याचा डाव संपवून चेन्नईने आपल्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली. नूरने 21 धावांत 3 विकेट टिपत घरातच हरत असलेल्या संघाला विजय मिळवून दिला त्याआधी संजू सॅमसनची फटकेबाजी (48) आणि आयुष म्हात्रे (38) आणि डेव्हाल्ड ब्रेव्हिस (41) यांच्या अफलातून फटकेबाजीने चेन्नईला 192 धावांचा टप्पा गाठून दिला.



























































