
महसूल विभागात कुणी टेबलाखालून पैसे घेणार असेल तर तहसीलदार आणि एसडीएमच्या प्रत्येक केबिनमध्ये सीसीटीव्ही लावा आणि ते जिल्हाधिकाऱयांच्या केबिनला जोडा, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. महसूल विभागातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी यापेक्षाही कठोर पावले उचलली जातील, असे संकेतही त्यांनी दिले.
भंडारा येथील लाखांदूर येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणानंतर चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. लोकाभिमुख प्रशासनासाठी अधिकाऱयांनी लोकाभिमुख होणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष कृतीमधून लोकाभिमुख प्रशासन दिसले पाहिजे अशा शब्दांत बावनकुळे यांनी अधिकाऱयांचे कान टोचले. अवैध वाळू उपसा व अन्य बेकायदा व्यवसायांशी महसूल अधिकारी किंवा कर्मचाऱयांचा संबंध आढळल्यास थेट बडतर्फ केले जाईल, असा गंभीर इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच वाळूमाफिया असेल वा कोणताही माफिया असो… त्यांची गय करू नका, अशा सूचना बावनकुळे यांनी पोलीस अधीक्षकांना दिल्या.
नागरिकांना भेटण्याची वेळ दर्शनी भागात लिहा लोकार्पण कार्यक्रमाला आल्यानंतर बावनकुळे यांना प्रशासकीय इमारतीमध्ये काही त्रुटी आढळल्या. त्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणात केला. प्रत्येक प्रशासकीय कार्यालयात विभागप्रमुखांनी नागरिकांच्या भेटीसाठी ठरलेली वेळ स्पष्टपणे फलकावर लिहावी. ती इथे कुठेही दिसली नाही, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱयांना जाब विचारला.






























































