
गेल्या काही वर्षातील मोठ्या गुन्ह्यांमधील अनेक आरोपी अद्यापही फरार आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी संतोष आंधळे, महादेव मुंडे प्रकरणातील आरोपी, नाशिक लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपी निदा, भोंदूबाब अशोक खरातची पत्नी कल्पना असे अनेक आरोपी फरार आहेत. यावरून विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
अंबादास दानवे यांनी X वर एक पोस्ट शेअर करत ”हे सरकार चालवत आहेत की ‘फरार गँग’चे पालकत्व घेत आहेत?” असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. ”हे सरकार चालवत आहेत की ‘फरार गँग’चे पालकत्व घेत आहेत? एकीकडे मुख्यमंत्र्यांची ‘रेकॉर्डेड’ कॅसेट वाजत असते… कडक कारवाई करू, सखोल चौकशी करू, कुणालाही सोडणार नाही, कठोर शासन करू. पण प्रत्यक्ष जमिनीवरचे वास्तव काय? नाशिक लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपी निदा फरार, भोंदू अशोक खरातची बायको फरार, याच खरातचा ‘लाडका’ सुपुत्र पसार, संतोष देशमुख प्रकरणातील कृष्णा आंधळे अजूनही फरार, महादेव मुंडे प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट. सवाल हा आहे की, आरोपी स्वतःहून गायब झालेत की त्यांना सरकारी ‘सेफ पॅसेज’ देऊन गायब केले गेले आहे? खटल्यांमध्ये जाणीवपूर्वक ‘लूज एंड्स’ ठेवून गुन्हेगारांना मोकळे रान करून दिले जात आहे का?”, असे अंबादास दानवे यांनी ट्विट केले आहे.



























































