
‘महिला आरक्षण विधेयक यापूर्वीच मंजूर झाले आहे. सर्वच राजकीय पक्षांचा त्यास पाठिंबा होता. त्याला आमचा विरोध असण्याचे कारणच नाही. प्रश्न आहे तो सरकारच्या प्रामाणिकपणाचा आणि अंमलबजावणीचा. महिला आरक्षणाची अवस्था लाडक्या बहिणीसारखी होऊ नये,’ अशी परखड भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज इंडिया आघाडीच्या बैठकीत मांडली.
संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. विविध पक्षांच्या भूमिका जाणून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बैठकीला संबोधित केले. ‘केंद्रातील भाजप सरकारची नियत साफ नाही हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. निवडणुका तोंडावर आल्या की श्रेय घेण्यासाठी असे मुद्दे काढायचे आणि नंतर त्याला पद्धतशीर बगल द्यायची, ही या सरकारची मानसिकता आहे. योजना चांगली असली तरी प्रश्न अंमलबजावणीचा असतो. त्यासाठी हेतू शुद्ध असावा लागतो. तो दिसत नाही’, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी लाडकी बहीण योजनेचे उदाहरण दिले. ‘निवडणुकीच्या तोंडावर भाजपने लाखो भगिनींना आश्वासने दिली. निवडणूक संपल्यानंतर आणि हेतू साध्य झाल्यावर याच भगिनींची भावनिक फसवणूक केली. तसे होता कामा नये, असेही त्यांनी नमूद केले.’
या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, के. सी. वेणुगोपाल, शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार संजय राऊत, शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार अरविंद सावंत, द्रमुकचे टी. आर. बालू, सुप्रिया सुळे, जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, तृणमूल काँग्रेसच्या सागरिका घोष यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीदेखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली.
लोकसभा मतदार संघांची पुनर्रचना राजकीय हेतूने प्रेरित आहे. ते ग्रामीण भागावर अन्याय करणारे आहे त्यामुळे याला आमचा विरोधच राहील! – उद्धव ठाकरे




























































