
अमेरिका आणि इराणमधील संघर्ष सोडवण्यासाठी पाकिस्तानकडून प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील वेळोवेळी पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांचे कौतुक केले आहे. ‘इस्लामाबाद टॉक्स’चे पहिले प्रयत्न निष्फळ ठरले आणि २१ तासांच्या चर्चेनंतर अमेरिका आणि इराण आपापल्या मागण्यांवर अडून बसले होते. मात्र पाकिस्तानने पुन्हा एकदा दोन्ही देशांना चर्चेसाठी एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर बुधवारी इराणच्या नेतृत्वाशी चर्चा करण्यासाठी तेहरानमध्ये पोहोचले. इराणी लष्कराचे अधिकृत माध्यम असलेले ‘इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स’ने (ISPR) दिलेल्या निवेदनानुसार, या शिष्टमंडळात मुनीर यांच्यासोबत गृहमंत्री मोहसिन नक्वी यांचाही समावेश आहे. निवेदनात म्हटले आहे की, ‘फील्ड मार्शल असीम मुनीर आणि गृहमंत्री मोहसिन नक्वी हे शिष्टमंडळासह सुरू असलेल्या मध्यस्थीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून तेहरानमध्ये दाखल झाले आहेत’. पीटीआयने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.


























































