
माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील सात विशेष तज्ज्ञ डॉक्टरांचे मानधन शासनाने सहा महिन्यांपासून थकवलेले आहे. एनएचएम (राष्ट्रीय आरोग्य योजना) अंतर्गत कंत्राटी स्वरूपात पूर्णवेळ तसेच २४ तासांत कधीही ऑन कॉल पद्धतीने रुग्ण सेवा देण्यासाठी सेवाभाव जपणाऱ्या डॉक्टरांवरच थकीत मानधनासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा वैद्यकीय अधीक्षक तसेच एनएचएम आयुक्त कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. मात्र थकीत ५० लाख मानधनाची फाईल पुढे सरकत नसल्याने अखेर सात डॉक्टरांनी शुक्रवार १७ एप्रिलपासून बेमुदत कामबंदचा इशारा दिला आहे. त्यामुळे माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवा सलाईनवर जाण्याची भीती आहे.
रायगड जिल्ह्यातील खेडोपाडी रुग्णसेवा मिळावी यासाठी एनएचएम अंतर्गत विशेषतज्ज्ञ डॉक्टरांची पदे भरण्यात आली. माणगाव उपजिल्हा रुग्णालयातही डॉ. संतोष कामेरकर (जनसर्जन), डॉ. बी. एस. सावंत (भूलतज्ज्ञ), डॉ. जुई शेठ (भूलतज्ज्ञ), डॉ. अभिजित मेहता (अस्थिरोगतज्ज्ञ), डॉ. जे.पी. पटेल (अस्थिरोगतज्ज्ञ), डॉ. शैलेश बर्फे (भिषक), डॉ. सिद्धी कामेरकर (स्त्रीरोगतज्ज्ञ) सेवा देत आहेत. माणगाव उपजिल्हा रुग्णालयांतर्गत महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, माणगाव, तळा, रोहा तालुक्यातील रुग्णसेवेचा भार या डॉक्टरांवर आहे.
दिवस-रात्र कधीही फोन आला तरी रुग्णांवर उपचार करण्यासाठी हे डॉक्टर हजर असतात. मात्र नोव्हेंबर २०२५ पासून या डॉक्टरांना मानधनच मिळालेले नाही. डॉ. बर्फे यांचे मानधन तर ऑगस्ट २०२५ पासून थकीत आहे. या सर्वांचे एकत्रित मानधन जवळपास ५० लाख होते. या सर्व डॉक्टरांनी ९ एप्रिल रोजी मंत्री भरत गोगावले यांची भेट घेऊन कैफियत मांडली. त्यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी मोबाईलवरून संभाषणही झाले. असे असूनही आजपर्यंत थकीत मानधनाचा विषय मार्गी लागलेला नाही. त्यामुळे १७एप्रिलपासून या डॉक्टरांनी बेमुदत कामबंदचा इशारा दिला आहे. याचा परिणाम थेट रुग्णसेवेवर होणार आहे.
‘स्पर्श’ प्रणालीमुळे घोळ
२०१८ पर्यंत जिल्हा वैद्यकीय धारा डॉक्टरांचे मानधन मिळत होते. २०१८ नंतर सिव्हिल सर्जन कार्यालयामार्फत मानधन मिळू लागले. त्यातच शासनाने स्पर्श प्रणाली आणली. मानधन सुलभरीत्या हस्तांतरित व्हावे यासाठी हे अॅप असले तरी अनेक तांत्रिक अडचणींमुळे प्रशासकीय अडथळे ठरत आहेत. याच तांत्रिक बाबींचे कारण देऊन एनएचएम अलिबाग कार्यालयातून नोव्हेंबर २०२५ पासून सात विशेषतज्ज्ञ डॉक्टरांचे मानधन थकवलेले आहे.
- गेल्या सहा महिन्यांपासून मानधन थकीत असतानाही केवळ रुग्णसेवेला प्राधान्य देऊन आम्ही सेवा देत आहोत. शासन स्तरावरील सर्व वरिष्ठ कार्यालयाशी पाठपुरावा करूनही आम्हाला न्याय मिळत नाही. अनेक अडचणींना आम्हाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन पाठवून आम्ही १७ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन करत आहोत.
डॉ. संतोष कामेरकर





























































