
ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सगळीकडे जोरात सुरू असून ‘जामतारा’ रॅकेट यासाठी कुप्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातही ड्रग्ज, बेकायदा कॉल सेंटरचा गोरखधंदा सुरू आहे. सरकारी संरक्षणामुळेच जगभरातील नागरिकांना फसवून शेकडो कोटी रुपयांची लूट सुरू असून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याचा या रॅकेटला आशीर्वाद असल्याचा आरोप कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत केला.
सीबीआयने 8 ऑगस्ट 2025 व 11 सप्टेंबर 2025 रोजी नोंदवलेल्या एफआयआरनुसार नाशिक आणि इगतपुरी येथे छापे टाकून बोगस कॉल सेंटर रॅकेट चालवणाऱ्यांना अटक केली. सीबीआयला इगतपुरीत सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरची माहिती मिळाली व कारवाई करण्यात आली. पण बोगस कॉल सेंटरचा सुगावा महाराष्ट्र पोलिसांना का लागला नाही? महाराष्ट्र पोलीस काय करत होते? असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
सीबीआय मुंबईच्या एसीबीचे अधीक्षक अमित वसावा यांनी 11 सप्टेंबर 2025 रोजी दाखल केलेल्या एफआयआरनुसार हे बोगस कॉल सेंटर चालू देण्यासाठी आरोपी गणेश कामनकर आणि त्याचा भाऊ हे पोलीस अधिकाऱ्यांना मोठय़ा प्रमाणात रोख रक्कम, सोने आणि क्रिप्टो करन्सीच्या रूपात लाच देत होते. सरकारला याची माहिती असतानाही या अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई का केली नाही याचे उत्तर फडणवीस यांनी द्यावे, अशी मागणी सपकाळ यांनी केली.
चौकशी करून कारवाई की नेहमीप्रमाणे ‘क्लीन चिट’?
बोगस कॉल सेंटर रॅकेट प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणाची सीबीआयकडून माहिती घेऊन उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? की नेहमीप्रमाणे ‘क्लीन चिट’ देणार, असे सपकाळ म्हणाले.
पोलीस अधिकाऱ्यांचा रॅकेटशी संबंध
भोंदूबाबा खरात याच्याशी संबंध असलेले आयपीएस अधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व सोमनाथ घार्गे या दोघांचाही या बोगस कॉल सेंटरच्या रॅकेटशी संबंध असल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. हे अधिकारी ठाणे पालघर आणि रायगडमध्ये कार्यरत असताना हे कॉल सेंटर तिथे सुरू होते. पोलिसांनी या कॉल सेंटरवर छापा टाकला आणि नंतर संदीप सिंह, विशाल यादव या आरोपींना जुजबी कारवाई करून सोडून दिले. या तिन्ही अधिकाऱ्यांची नाशिकमध्ये बदली झाल्यावर या आरोपींना हाताशी धरून कॉल सेंटर सुरू केल्याची माहिती मिळत असल्याचे सपकाळ म्हणाले.





























































