
झारखंडच्या छत्रा जिल्ह्यातील पिपरवार परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत चार कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षा दलांना यश आले आहे. ठार झालेल्यांमध्ये दीड लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी सहदेव महातो याचाही समावेश आहे. गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी छत्रा-हजारीबाग सीमेवर शोधमोहीम सुरू केली होती.
टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, या चकमकीत झारखंड पोलिसांव्यतिरिक्त कोब्रा बटालियनचे जवानही सहभागी झाले होते. चकमकीनंतर, नाकाबंदी आणि शोध मोहीम सुरू असून, घटनास्थळावरून चार नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे व दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील चाईबासाच्या सारंडा जंगलात झालेल्या चकमकीत 1 कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी ठार झाला. या चकमकीत सुरक्षा दलाचे सहा जवान जखमी झाले. जखमी जवानांमध्ये कोब्रा 205 बटालियनचे इन्स्पेक्टर सत्य प्रकाश, तसेच कोब्रा 210 बटालियनचे जवान शैलेश कुमार दुबे, उत्तम सेनापती, जितेंद्र कुमार राय, प्रेम कुमार आणि हेड कॉन्स्टेबल अभिनय मित्तल यांचा समावेश आहे.




























































