
पश्चिम रेल्वेवर रविवारी सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 या वेळेत ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रवाशांनी ब्लॉक लक्षात घेऊनच आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ब्लॉक कालावधीत जलद लाईनवरील सर्व उपनगरीय गाड्या सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर धावतील. काही उपनगरीय सेवा रद्द केल्या जातील, तर काही बोरिवली आणि अंधेरी सेवा हार्बर लाईनवरून गोरेगावपर्यंत धावतील.
पनवेल आणि वाशी विभागांदरम्यानच्या हार्बर मार्गावर तसेच पनवेल आणि ठाणे विभागांदरम्यानच्या ट्रान्स हार्बर मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील हार्बर सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील ट्रान्स-हार्बर सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई-वाशी सेक्शनवर विशेष गाड्या धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा तसेच पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असतील.



























































