‘टीसीएस’वरील विश्वासाला तडा? नोकरकपात, नाशिक अत्याचार, न्यायालयीन प्रकरणांचा फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉम्प्युटर क्षेत्रातील बलाढय़ संस्था असलेल्या टाटा कन्सलटन्सी सर्व्हिस (टीसीएस) मध्ये गेल्या काही महिन्यांत केलेली मोठी नोकरकपात, रखडलेले न्यायालयीन खटले आणि नाशिक अत्याचार प्रकरणामुळे टीसीएसवरच्या कारभारावर जोरदार टीका केली जात आहे. त्यामुळे टीसीएसवरील विश्वासाला तडा जात असल्याचे बोलले जात आहे.

नाशिकमधील महिला अत्याचार, धर्मांतर प्रकरणामुळे टीसीएस अडचणीत आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी सात संशयितांना ताब्यातही घेतले आहे. या प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील प्रकल्प बंद करून तो इतरत्र हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत. या प्रकरणामुळे टीसीएसमधील गुंतवणुकीकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे.

अशी आहे नाशिकमधील स्थिती

नाशिकमध्ये सध्या सुमारे 250 आयटी कंपन्या सुरू आहेत. या कंपन्यांमध्ये 15 ते 18 हजार कर्मचारी काम करीत आहेत. यामध्ये महिलांचे प्रमाण 40 ते 50 टक्के आहे. मात्र नाशिकच्या नामांकित कंपनीत घडलेल्या प्रकारामुळे संभाव्य फटका लक्षात घेऊन टीसीएसने कार्यवाही सुरू केल्याचे समजते.

कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम

महिला अत्याचार, लैंगिक प्रकरणामुळे दबाव वाढत असल्याने केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र टीसीएसचा हा निर्णय कर्मचाऱ्यांना घडलेल्या प्रकरणात गप्प राहण्यासाठी घेण्यात आल्याचा आरोप पह्रम फॉर आयटी एम्प्लॉईज कंपनीने केला आहे.