
<<विशाल फुटाणे>>
पुणे जिह्यातील जुन्नर तालुक्यात कुकडी नदीच्या उगमाजवळ वसलेले कुकडेश्वर मंदिर हे केवळ एक प्राचीन शिव मंदिर नाही, तर मध्ययुगीन धार्मिक जीवनाची आणि योग परंपरेची साक्ष देणारे एक महत्त्वाचे सांस्कृतिक स्थळ आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिराभोवती दिसणारी काही विलक्षण शिल्पे संशोधकांचे विशेष लक्ष वेधून घेतात. या शिल्पांमध्ये अत्यंत कृश देहयष्टी असलेले, मोठय़ा कानातील भोकं असलेले, जटा बांधलेले आणि हातात पात्र अथवा शस्त्र धारण केलेले तपस्वी दिसतात. या वैशिष्टय़ांवरून या शिल्पांचा संबंध नाथ संप्रदायाशी असण्याची शक्यता प्रबळ मानली जाते.
भारतीय शिल्प परंपरेत साधू-संन्याशांचे विविध प्रकार आढळतात. मात्र नाथ संप्रदायाशी संबंधित योगींची काही विशिष्ट ओळख असते. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे कानफाटे (कानफटा) योगी. नाथपंथीय साधूंमध्ये दीक्षा घेताना कानात मोठे छिद्र करून त्यात गोल कुंडले धारण करण्याची परंपरा आहे. त्यामुळे त्यांना ‘कानफाटे नाथ’ असेही म्हटले जाते. कुकडेश्वर मंदिर परिसरातील शिल्पांमध्ये स्पष्टपणे मोठय़ा कानछिद्रांचे आणि कुंडलांचे दर्शन घडते. हे वैशिष्टय़ या शिल्पांना नाथ परंपरेशी जोडणारे महत्त्वाचे संकेत आहे.
या शिल्पांतील दुसरे लक्षवेधी वैशिष्टय़ म्हणजे अत्यंत कृश आणि हाडकुळी देहयष्टी. भारतीय अध्यात्म परंपरेत शरीर क्षीण करणे, उपवास, तपश्चर्या आणि कठोर योगसाधना यांना विशेष महत्त्व आहे. नाथपंथीय योगी ‘कायाक्लेश’ किंवा ‘कायाकल्प साधना’ करीत असत. या साधनेत शरीराला अत्यंत कठोर तपश्चर्येचा अनुभव दिला जात असे. दीर्घकाळ उपवास, ध्यान, प्राणायाम आणि विविध योगक्रिया यांमुळे शरीर कृश होत असे. परंतु या देहक्लेशामागील तत्त्वज्ञान वेगळे आहे. शरीर क्षीण झाले की आत्मबल वाढते आणि साधकाचे अंतर्मन अधिक शक्तिशाली होते, अशी त्यामागील संकल्पना आहे.
भारतीय शिल्पकलेत अशा कृश देहाचे दर्शन नवीन नाही. गंधार शिल्पशैलीतील बुद्धाची ‘कायाक्लेश’ प्रतिमा हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. बुद्धांनी ज्ञानप्राप्तीपूर्वी केलेल्या कठोर तपश्चर्येचे प्रतीक म्हणून त्यांना अत्यंत कृश स्वरूपात दाखवले गेले आहे. त्याचप्रमाणे जैन शिल्पांमध्येही दीर्घ उपवास करणारे तपस्वी साधू क्षीण शरीरासह दर्शवले जातात. त्यामुळे कुकडेश्वर मंदिरातील शिल्पांमध्ये दिसणारी कृश देहयष्टी ही स्वतला इजा करण्याची किंवा रक्त काढण्याची प्रतिमा नसून कठोर साधना आणि आत्मसंयमाचे प्रतीक आहे.
या शिल्पांमध्ये दिसणारी विशिष्ट प्रकारे बांधलेली जटादेखील नाथपंथीय संन्याशांचे वैशिष्टय़ आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि मध्य प्रदेश या प्रदेशांमध्ये मध्ययुगीन काळात नाथ संप्रदायाचा मोठा प्रभाव होता. गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ या महायोगींनी या परंपरेचा प्रचार केला.
कुकडेश्वर मंदिर परिसरातील काही शिल्पांमध्ये साधूंच्या हातात शस्त्र आणि पात्रदेखील दिसते. नाथ आणि नागा संन्याशांच्या परंपरेत यामागे एक विशेष ऐतिहासिक संदर्भ आहे. मध्ययुगीन भारतात अनेक संन्यासी संप्रदायांनी अखाडय़ांची स्थापना केली. या आखाडय़ांमध्ये साधू केवळ आध्यात्मिक साधनाच करत नसत, तर युद्धकौशल्य आणि शस्त्रप्रशिक्षणही घेत असत. त्यामुळे नागा संन्यासी परंपरेत त्रिशूल, खड्ग किंवा कटय़ार यांसारखी शस्त्र धारण करणे सामान्य मानले जात होते. या शिल्पांतील दुसऱया हातातील पात्र किंवा कमंडलू हे संन्याशाचे पारंपरिक चिन्ह आहे. भिक्षा मागण्यासाठी आणि पाणी साठवण्यासाठी हे पात्र वापरले जात असे. त्यामुळे एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात भिक्षापात्र असे दर्शन म्हणजे संन्यास व संरक्षण यांचा संगम दर्शविणारी प्रतिमा होय. मध्ययुगीन मंदिरशिल्पांमध्ये साधू-योगींच्या मूर्तींचा उपयोग अनेकदा मंदिररक्षक किंवा साधना-दर्शक शिल्प म्हणून केला जात असे. मंदिरात येणाऱया भक्तांना आध्यात्मिक जीवनाचा आदर्श दाखवणे हा त्यामागील उद्देश असू शकतो. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये प्राचीन काळापासून योगी, सिद्ध आणि संन्याशांची साधना चालत असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे कुकडेश्वर परिसरही त्या व्यापक योग परंपरेचा एक भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आज या शिल्पांकडे केवळ कलात्मक दृष्टीने पाहण्यापेक्षा त्यामागील आध्यात्मिक आणि ऐतिहासिक संदर्भ समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. ही शिल्पे आपल्याला मध्ययुगीन भारतातील संन्यास, योगसाधना आणि धर्मसंरक्षण या त्रिसूत्रीची आठवण करून देतात.
(लेखक पुराततत्व संशोधक आहेत.)

























































