विज्ञान रंजन – जगती हवा-पाण्याविना…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विनायक

माणसांच्या श्वासोच्छ्वासाचं गणित किंवा ‘एकेका सासाचं तंतर’ (तंत्र) किती अजब, गहन आणि तितकंच गमतीचं कसं आहे ते आपण वाचलंय. आपल्या श्वसनासाठी ऑक्सिजन किंवा प्राणवायूचे महत्त्व किती आहे ते सर्वच जाणतात. प्राणायाम करतानासुद्धा सराव असल्याविना फार काळ श्वास रोखून धरता येत नाही. पोहतानाही पाण्याखाली जाताना श्वास रोखण्याची तयारी करावी लागते. प्राणवायूशिवाय माणूस किंवा त्यावरच श्वसन अवलंबून असलेले प्राणी केवळ काही मिनिटंच जगू शकतील.

पाण्याचा प्रश्न थोडा निराळा. तहानेवर बराच काळा अगदी दिवसभरसुद्धा ताबा ठेवता येईल, परंतु शरीरातलं पाणी कमी होऊ लागलं की, रक्ताला घट्टपणा येऊ लागल्यावर मेंदू वारंवार पाणी ‘पिण्याची’ सूचना करू लागेल तरीसुद्धा पाच-सात तास तहान सहन करणं जमतं. कडक उपोषण वगैरे करणारे पाणीसुद्धा प्यायला नकार देतात तेव्हा त्यांच्या धैर्याचं कौतुक वाटते. शहीद भगतसिंग यांचे सहकारी जतीन दास यांनी तरुण वयातच तुरुंगात अन्न-पाण्याचा त्याग करून देशासाठी हौतात्म्य स्वीकारलं तेव्हा साऱया देशाने त्यांना मानवंदना दिली.

उपोषण वगैरे जाऊ द्या, साधं बारा किंवा सोळा तासांचं दोन जेवणांमधलं ‘इस्टरमिटन्ट फास्टिंग’ आरोग्याच्या हिताचं असतं असं म्हटलं जातं. करून पाहा. अगदीच गरज भासली तर केवळ पाणी प्यायचं असा त्यातला नियम असतो. हळूहळू सराव करत ते जमतंही, पण तोपर्यंत सहनशीलता (पेशन्स) टिकवायला लागते. एरवी आपल्याकडे ‘एकादशी नि दुप्प्ट खाशी’ असा वाप्रचार आलाच नसता. आपल्या अन्न-पाणी सेवनाच्या अतिरेकाशी तो निगडित आहे. बैठे काम करणाऱयांनी तर आहार कमी करायला हवा, पण त्याच काळात बरंचसं सटरफटर आणि वजन वाढवणारं ‘जंक फूड’ फस्त केलं जातं.

हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे पृथ्वीवर हवा, पाण्याविना जगणारे जीव आहेत का याचा अभ्यास करताना गुगल आणि इतरत्रही बरीच माहिती मिळत गेली. त्यातील सर्व गोष्टींचा ऊहापोह करायला लागलं तर ते जीवनशास्त्र्ाावरच्या निबंधासारखं वाटेल. आपण फक्त त्यामागचं विज्ञान आणि रंजक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करू या. हवा-पाणी-अन्नाविना माणूस किती काळ काढू शकतो हे ज्याच्या त्याच्या प्रकृतीवर आणि मानसिक क्षमतेवर ठरतं.

मात्र निसर्गानेच ज्यांना हवा किंवा प्राणवायूविना जगायला शिकवलंय असे कितीतरी सूक्ष्म सजीव आहेत. यापैकी हॅन्नेग्युआ सॅल्मिनिकोला हे सूक्ष्मजीव बहुपेशीय बांडगुळासारखे असतात. त्यांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज भासत नाही. आपल्या ‘आश्रयदात्या’च्या अक्षरशः जिवावरच ते जगतात. साल्मन माशांमध्ये अशी बांडगुळं आढळतात. याशिवाय अनेक एकपेशीय सजीवांना (बॅक्टेरिया, आर्किया) प्राणवायूची गरज नसते. आर्किया अतिशय उष्ण किंवा खारट आणि आम्लयुक्त वातावरणात राहतात.

प्राणवायूची गरज नसणारे सूक्ष्म सजीव नुसत्या डोळय़ांनी दिसत नाहीत. ते मायक्रोस्कोपने पाहावे लागतात, परंतु पाण्याविना बराच काळ जगणारे सजीव आपण पाहू शकतो. आपल्याला रोज सुमारे तीन ते चार लिटर पाणी लागते. सध्याच्या उन्हाळय़ाच्या दिवसात येणाऱया घामामुळे हे प्रमाण पाच-सहा लिटरपर्यंतही जाऊ शकते. मात्र उंटासारखा मोठय़ा शरीराचा आणि वाळवंटातील ‘जहाज’ मानला जाणारा प्राणी प्रखर उन्हाचा तडाखा सहन करत सुमारे पंधरा दिवस पाण्यावाचून राहू शकतो.

पूर्वी एक गोष्ट आम्हाला सांगितली जायची, कदाचित तुम्हीही ऐकली असेल, ती म्हणजे उंटाच्या शरीरात पाणी साठवण्याची ‘पिशवी’ असते किंवा तो त्याच्या ‘वशिंडा’मध्ये (हम्प) पाणी साठवतो. अर्थात हे वैज्ञानिकदृष्टय़ा खरं नाही. एकावेळी साधारण 150 लिटर पाणी पिऊन ते शरीरात टिकवण्याची कला त्याला निसर्गानेच शिकवलेली असते. पाणी मिळत नाही तेव्हा त्याच्या ‘वशिंडा’तील ऊर्जा त्याला मिळते. शिवाय उंटाच्या रक्तपेशींमध्येच अधिक पाणी ‘साठवण्याची’ सोय असते. या पेशी लवचिक (इलॅस्टिक) आणि लंबगोलाकार (ओव्हल शेप) असतात. गरजेच्या वेळी त्यांचा आकार सुमारे 200 टक्के वाढू शकतो. पाणी दुर्भिक्ष असते तिथे उंटाच्या शरीरातून पाणी बाहेर टाकण्याची क्रिया मंद होते. अशा परिस्थितीत उच्छ्वास सोडतानाही उंटाला नाकातून बाहेर पडणाऱया हवेतील बाष्प (वाफेतील पाणी) पुन्हा आत शोषून घेता येते. दुसरा ‘कांगारू रॅट’ नावाचा घुशीसारखा प्राणी केवळ अन्नातून आणि हवेच्या दमटपणातून मिळणाऱया पाण्यावरच जगतो. तो अनेक वर्षे किंवा आयुष्यभरात कधीच पाणी पित नाही.

डेझर्ट टॉरटॉइज किंवा वाळवंटातील कासवसुद्धा त्याच्या ब्लॅडरमध्ये पाणी साठवून अनेक दिवस पाण्याविना राहतो. थॉर्नी डेव्हिल हा ऑस्ट्रेलियातील काटेरी त्वचेचा सरडा हिवाळय़ात पडणारं दव आणि पावसाच्या पाण्याच्या काही थेंबांवर आपली वर्षभराची तहान भागवतो. ‘काउच टोड’ हे मोठे बेडूक स्वतःला बराच काळ जमिनीतील दमट भागात पुरून घेतात आणि हायबरनेशन किंवा सुस्त अवस्थेत जाऊन कितीतरी काळ अन्न-पाण्याविना तसेच राहतात. गोगलगायसुद्धा याच पद्धतीने जगते. अनेक सजीवांना त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण त्वचेमुळे वातावरणातल्या दमटपणातील पाणी शोधून घेता येते. हवा आपल्याला अत्यावश्यक असते. पाणी आपलं ‘जीवन’ असतं आणि अन्नाविना फार काळ राहता येत नाही, परंतु या तिन्ही गोष्टींविना जिवंत राहणारे जीव आपल्या पृथ्वीवर आहेत.