मुंबईत दादरमध्ये महानगर गॅसच्या पाईपलाईनला गळती; अग्निशमन दल घटनास्थळी, गोखले मार्गावरील वाहतूक वळवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील गजबजलेल्या दादर परिसरात गॅस गळतीची एक मोठी घटना समोर आली आहे. दादर येथील गोखले रोडवर असलेल्या प्रबोधनकर ठाकरे चौकात खोदकामाचे काम सुरू असताना हा अपघात झाला. या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या जेसीबी मशीनच्या पंजाचा धक्का चुकून भूमिगत गॅस पाईपलाईनला लागला. या जोरदार धक्क्यामुळे महानगर गॅस लिमिटेडची (MGL) मुख्य पाईपलाईन फुटली आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर गॅस गळती सुरू झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ मोठी खळबळ उडाली होती.

गॅस गळतीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने अमरहिंद मंडळाजवळील गोखले मार्गावरील वाहतूक तातडीने रोखली आहे. वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी वाहतूक पोलिसांनी हा मार्ग तात्पुरता बंद करून ती इतर पर्यायी मार्गांवर वळवली आहे.