Ratnagiri News – अवकाळी पावसाने दाभोळे परिसरात जनजीवन विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे गाव आणि परिसरामध्ये काल मध्यरात्रीपासूनच अचानक हवामानात बदल झाला असून मध्यरात्री आणि आज रविवारी (31 मे 2026) सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसाने वातावरणात कमालीचा गारवा निर्माण केला असला, तरी अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
सकाळपासूनच आकाश दाट मळभाने झाकलेले होते त्यानंतर काही वेळातच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. या अनपेक्षित पावसामुळे दैनंदिन कामांसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली.जसा पावसाचा जोर हळूहळू वाढत चालला आहे तसा परिसरातील जनजीवनावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. पावसाच्या या आकस्मिक आगमनामुळे बाजारपेठेमध्ये शांतता पसरली असून, दुकाने आणि रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.सध्या संपूर्ण परिसरात पावसाने जोर धरला असून वेग वाढत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याचे दिसून येत आहे.