
कॉक्रोच जनता पार्टी ही युवकांची चळवळ आहे. आज आठ लाख लोकांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला आहे. परंतु या विद्यार्थ्यांच्या मागणीवर कुठलाही प्रतिसाद सरकारने दिला नाही. दोन सरकारी अधिकाऱ्यांची बदली केली, परंतु त्यांना निलंबित केले नाही. मागील काही वर्षांपासून देशात फार पत्रकार परिषद घेतल्या जात नाही. कुणी जबाबदारी घेत नाही. 6 जूनला अभिजीत दीपके यांनी जंतरमंतरला आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाला देशातील युवकांनी यावे आणि शांततेत त्यांचं म्हणणे मांडावे. परीक्षेतील घोटाळ्यांसाठी जबाबदार असणारे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे, असे कॉक्रोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी म्हटले.
गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियात चर्चेत असणाऱ्या कोक्रॉच जनता पार्टीची पहिली पत्रकार परिषद दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. मुख्य प्रवक्ते सौरव दास, प्रवक्ते विजेता दहिया, आशुतोष राका उपस्थित होते.
यावेळी सौरव दास म्हणाले की, सोनम वांगचूक यांनीही आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून तेदेखील आंदोलनात सहभागी होतील. आंदोलनात सर्व युवकांनी सहभागी व्हावे. सत्ताधारी असो वा विरोधी पक्षातील युवकांनी त्यांचा बॅनर न आणता आंदोलनात यावे. सर्व राजकीय पक्षातील युवकांना आम्ही आंदोलनात येण्याचे आवाहन करतो.
दिवसरात्र मेहनत करून परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय. त्यावर कुणी बोलत नाही. आपण निवडून दिलेले प्रतिनिधी राजा नाहीत तर जनतेचे कामगार आहेत. जर ते योग्य काम करत नसतील तर आपण प्रश्न विचारायला हवेत. जबाबदारी निश्चित केली जावी. जे सक्षम असतील त्यांना शिक्षणमंत्री बनवावे असं प्रवक्ते विजेता दहिया यांनी म्हटले.
या देशात अनेक परीक्षेत घोटाळे झाले आहेत. आम्ही युवकांची लढाई लढतोय. कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन होईल. ही लढाई कुणा एकाची नाही तर देशातील विद्यार्थ्यांची आहे. देशातील विद्यार्थ्यांना जंतरमंतरवर यायची गरज का वाटतेय, धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाही हा प्रश्न आहे असे आशुतोष राका यांनी सांगितले.
तीन प्रवक्ते निवडले
दिल्लीत होणाऱ्या आंदोलनापूर्वी कॉक्रोच जनता पार्टीने तीन प्रवक्त्यांची घोषणा केली. पक्षाच्या वतीने आंदोलने, जनसंपर्क आणि माध्यमांशी संवाद साधण्याची जबाबदारी या तिघांवर सोपवण्यात आली आहे. शोध पत्रकार सौरव दास हे मुख्य प्रवक्ते तर राजकीय संशोधक, लेखक- निर्माते विजेता दहिया आणि आयआयटी कानपूर – लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे माजी विद्यार्थी आशुतोष रांका यांची प्रवक्तेपदी निवड झाली आहे. पक्षाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतातील राजकीय चर्चेची दिशा बदलण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि या परिवर्तनाचे नेतृत्व नव्या पिढीतील आमचे नेते करतील.



























































