
वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील (NEET) कथित अनियमितता आणि पेपरफुटीच्या वृत्तांमुळे आलेल्या नैराश्यातून मध्य प्रदेशातील एका 18 वर्षीय विद्यार्थिनीने नागपूर येथे गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आकांक्षा चतुर्वेदी असे या मृत विद्यार्थिनीचे नाव असून, ती मध्य प्रदेशातील मौगंज जिल्ह्यातील मगनिया गावची रहिवासी होती. “आई-बाबा, आता पुन्हा नीट परीक्षा देण्याची हिंमत माझ्यात उरली नाही,” अशी भावनिक नोट लिहून तिने हे टोकाचे पाऊल उचलले. ही घटना 20 मे रोजी घडली, मात्र आकांक्षाच्या खोलीत सापडलेल्या सुसाईड नोटमुळे परीक्षा पद्धती आणि विद्यार्थ्यांवरील मानसिक दबावाबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा नागपूरमधील एका नामांकित कोचिंग संस्थेमार्फत नीट परीक्षेची तयारी करत होती. 20 मे रोजी ती तिच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेच्या काही दिवसांनंतर तिच्या कुटुंबीयांना खोलीत एक चिठ्ठी सापडली, ज्यामध्ये तिने आपल्या मनातील वेदना व्यक्त केली होती. तिने चिठ्ठीत लिहिले होते की, “आई-बाबा, तुम्हाला विश्वास होता की तुमची मुलगी मन लावून अभ्यास करेल आणि डॉक्टर बनेल, पण आता पुन्हा नीट परीक्षा देण्याची हिंमत माझ्यात उरली नाही. पहिल्याच प्रयत्नात मला चांगले गुण मिळत होते, पण आता पुन्हा चांगली कामगिरी होईल याची काहीच खात्री नाही. आई-बाबा, मला माफ करा. मी सगळं काही उद्ध्वस्त केलं आहे.” आकांक्षाचे वडील कृष्ण कुमार चौबे हे एक शेतकरी आहेत. त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी मोठी आर्थिक जोखीम पत्करली होती. आपल्या लहान जमिनीच्या तुकड्यावर शेती करण्याबरोबरच ते नागपूरमध्ये आचारी म्हणून काम करून घरखर्च आणि मुलीच्या शिकवणीची महागडी फी भागवत होते.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षाच्या शिक्षणासाठी कुटुंबाने किसान क्रेडिट कार्डद्वारे सुमारे 3 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते आणि इतर नातेवाईकांकडूनही आर्थिक मदत घेतली होती. आकांक्षाचे काका जगदीश प्रसाद चतुर्वेदी यांनी सांगितले की, परीक्षा संपल्यानंतर आकांक्षा अत्यंत आत्मविश्वासाने आणि आनंदाने घरी परतली होती. तिला परीक्षेत 650 पेक्षा जास्त गुण मिळतील अशी खात्री होती आणि कुटुंबही तिच्या यशाबद्दल आशावादी होते. मात्र, त्यानंतर देशभरात नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या बातम्या येऊ लागल्या. या बातम्यांमुळे आकांक्षाला मोठा मानसिक धक्का बसला. तिने खाणेपिणे सोडले, लोकांशी बोलणे कमी केले आणि ती सतत प्रचंड अस्वस्थ राहू लागली. या वादाचा तिच्या मनावर इतका खोल परिणाम झाला की, परीक्षेतील या अनियमिततेमुळे आपली वर्षभराची मेहनत आणि कामगिरी पूर्णपणे वाया जाईल, अशी भीती तिला सतावत होती.




























































