
तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि टीव्हीके पक्षाचे अध्यक्ष सी. जोसेफ विजय यांनी काँग्रेससोबत युतीधर्म पाळला आहे. विजय यांनी राज्यसभेची रिक्त झालेली एकमेव जागा काँग्रेसला देण्याची घोषणा बुधवारी केली. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (AICC) पदाधिकारी प्रवीण चक्रवर्ती यांची राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
तमिळनाडूसाठी काँग्रेसचे प्रभारी गिरीश चोडणकर यांनी विजय यांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. यावेळी चोडणकर म्हणाले की, “विजय यांनी दिलेला शब्द पाळून तत्त्वनिष्ठ नेतृत्व, राजकीय प्रामाणिकपणा आणि मित्रपक्षांचा आदर याचे उदाहरण घालून दिले आहे. या निर्णयामुळे विश्वास आणि परस्पर सन्मानावर आधारित आघाडीच्या राजकारणावरील श्रद्धा अधिक दृढ झाली आहे.”
विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या पाच आमदारांनी टीव्हीके सरकारला पाठिंबा दिला होता. त्यावेळी झालेल्या निवडणुकीनंतरच्या कराराचाच एक भाग म्हणून राज्यसभेची जागा काँग्रेसला देण्यात आल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. राज्यसभा निवडणूक होताच प्रवीण चक्रवर्ती यांना उमेदवारी देण्याचा निर्णय काँग्रेसने आधीच घेतला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे चक्रवर्ती यांचे विजय यांच्याशीही चांगले संबंध असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
तमिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष के. सेल्वपेरुन्थगई यांनी राज्यसभेच्या उमेदवाराबाबतची अधिकृत घोषणा एआयसीसीकडून केली जाईल, असे स्पष्ट केले.
माजी एआयएडीएमके खासदार सी. वे. शन्मुगम यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ८ जून असून, अर्जांची छाननी ९ जून रोजी होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत ११ जून आहे. तर मतदान १८ जून रोजी होणार आहे.

























































