
वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील (NEET) कथित अनियमितता आणि पेपरफुटीच्या वृत्तांमुळे आलेल्या नैराश्यातून मध्य प्रदेशातील एका 18 वर्षीय विद्यार्थिनीने नागपूर येथे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आकांक्षा असे या मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या अत्यंत दुर्दैवी घटनेवरून देशातील राजकारण तापले आहे. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आकांक्षाचा मृत्यू ही आत्महत्या नसून मोदी सरकारच्या भ्रष्ट आणि मोडकळीस आलेल्या व्यवस्थेचा परिणाम असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करत या घटनेवर तीव्र दुःख आणि संताप व्यक्त केला. राहुल गांधी म्हणाले की, आकांक्षाला डॉक्टर बनून देश आणि समाजाची सेवा करण्याची तीव्र इच्छा होती. तिचे वडील अत्यंत सामान्य शेतकरी आहेत. आपल्या मुलीचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी किसान क्रेडिट कार्डवर 3 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. इतकेच नव्हे तर, मुलीच्या कोचिंगचा खर्च आणि इतर गरजा भागवण्यासाठी त्यांनी स्वतः नागपूरमध्ये आचाऱ्याची नोकरी पत्करली होती. एका वडिलांनी आपल्या मुलीच्या भविष्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. पण त्यानंतर नीटचा पेपर फुटला आणि परीक्षा रद्द झाली. याच अनिश्चिततेच्या गर्तेत सापडलेल्या आकांक्षाने अखेर नैराश्यातून आपले जीवन संपवले.
आकांक्षा डॉक्टर बनकर देश और समाज की सेवा करना चाहती थी। आकांक्षा के पिता किसान हैं। बेटी के डॉक्टर बनने के सपने के लिए किसान क्रेडिट कार्ड पर ₹3 लाख का कर्ज़ लिया। और नागपुर में खुद कुक की नौकरी कर ली, ताकि बेटी वहाँ coaching कर सके।
एक पिता ने जो कर सकता था, सब किया।
फिर NEET… https://t.co/yaIHayXfrG— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 4, 2026
या संपूर्ण प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावरही राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. एवढी मोठी घटना घडूनही धर्मेंद्र प्रधान अजूनही शिक्षणमंत्री पदावर कायम आहेत. यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. परीक्षांमध्ये घोटाळे झाले की पुन्हा तीच समिती, त्याच बदल्या आणि त्याच चौकशांचा फार्स सुरू होतो; पण व्यवस्थेत कोणतीही सुधारणा होत नाही आणि विद्यार्थ्यांना न्यायही मिळत नाही, अशी टीका त्यांनी केली. पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून राहुल गांधी म्हणाले की, सरकारी पदे ही कायमस्वरूपी नसतात, ती येत-जात राहतात. गेल्या 12 वर्षांत केंद्र सरकारने देशाच्या शिक्षण व्यवस्थेची जी दुरवस्था केली आहे, त्याची खूप मोठी किंमत आज हिंदुस्थानच्या तरुण पिढीला मोजावी लागत आहे, असा संताप त्यांनी यावेळी व्यक्त केला.


























































