16 लघु उद्योजकांवर आभाळ फाटले, वागळे इस्टेटमधील गाळे 48 तासांत रिकामे करण्याचा फतवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्लस्टरसाठी ठाण्यातील लघु उद्योजकांना महापालिकेने वेठीला धरले आहे. वागळे इस्टेटमधील गाळे ४८ तासांत रिकामे करण्याचा फतवा प्रशासनाने काढला आहे. महापालिकेने १६ लघु उद्योजकांना अंतिम इशाऱ्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे एकेकाळी आशिया खंडातील उद्योगनगरी ओळखल्या जाणाऱ्या येथील उद्योजकांवर अक्षरशः आभाळ फाटले आहे. पालिकेच्या या तुघलकी कारभाराविरोधात उद्योजकांनी संताप व्यक्त केला असून या नोटिसा तत्काळ मागे घ्या, अशी मागणी केली आहे.

वागळे इस्टेट येथील रोड क्रमांक २२ येथील फेरोडाय कंपाऊंडमध्ये लघु उद्योजक आहेत. या फेरोडाय कंपाऊंड परिसरात ठाणे पालिकेला क्लस्टर योजना राबवायची आहे. त्यामुळे या कंपाऊंडमधील सुमारे १६ लघु उद्योजकांना ४८ तासांत जागा खाली करण्याची व पाडकामाची नोटीस देण्यात आली आहे. या नोटिशींमुळे लघु उद्योजकांपुढे गंभीर संकट उभे राहिले असून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून लघु उद्योगांचे मानवतेच्या दृष्टीने व सामाजिक हेतू समोर ठेवून संरक्षण करावे, अशी मागणी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.

लघु उद्योगांमध्ये सुमारे ३५० हून अधिक कामगार असून त्यांच्या कुटुंबांसह सुमारे १ हजार ४०० पेक्षा अधिक जणांचा उदरनिर्वाह चालतो.

नोटिसांमुळे कामगार भयभीत झाले असून उद्योगांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

खबरदार बुलडोझर फिरवला तर…

एकेकाळी सोन्याचा धूर येणाऱ्या इंडस्ट्रीतील उद्योजकांना मारण्याचे काम चालू आहे. ज्या अधिकाऱ्यांनी नोटिसा पाठवल्या त्यांनी आधी येऊरमधील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करावी. सत्ताधाऱ्यांमधील कुणीतरी हे काम करत असून खबरदार कुणी बुलडोझर फिरवला तर, अशा इशारा भाजपचे आमदार संजय केळकर यांनी दिला आहे.

लघु उद्योजकांचा क्लस्टर पुनर्विकासाला विरोध नाही. मात्र उद्योग विस्थापित होत असतील तर त्यांचे योग्य पुनर्वसन, पर्यायी जागा व उद्योग सातत्य राखण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.

संदीप पारीख (अध्यक्ष- टिसा संघटना)

पालिकेने ४८ तासांची नोटीस तत्काळ स्थगित करावी. तसेच सर्व लघु उद्योजकांशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढून त्यांना न्याय द्यावा.

एकनाथ सोनवणे (कार्यकारी सचिव टिसा)