
महसूल गुप्तचर संचालनालयाने महाराष्ट्रासह गुजरात, दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये केलेल्या धडक कारवाईत तब्बल १२० कोटी रुपयांच्या सुमारे ३ लाख ई-सिगारेट जप्त केल्या आहेत. सीमाशुल्क तपासणी चुकवण्यासाठी या ई-सिगारेट चीनमधून आणल्या जात होत्या. फर्निचर, कपडे अशा वस्तूंमध्ये लपवून त्या हिंदुस्थानात आणल्याचे निष्पन्न झाले. देशभरातील या छापेमारीमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
सध्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींमध्ये ई-सिगारेटची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. ई-सिगारेटमध्ये तंबाखू नसली तरी त्यातून विषारी निकोटीन आणि घातक रसायनांची वाफ शरीरात जाते. ही वाफ आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. ई-सिगारेट पेन्सिल किंवा छोट्या पेनसारखी दिसतात. यात फळांचे विविध फ्लेवर्स आणि सुगंध असतो. सामान्य सिगारेटसारखा याचा धूर किंवा दुर्गंधी येत नाही.
बंदी असतानाही बनावट कागदपत्रांच्या नावाखाली हिंदुस्थानात ई-सिगारेटची तस्करी सुरूच आहे. दरम्यान मागील काही महिन्यांत महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या कारवाईत महाराष्ट्रातील जेएनपी, गुजरात, पश्चिम बंगालमधील विविध बंदरे, एअरपोर्ट व इतर ठिकाणी धाडी टाकून तब्बल १२० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.



























































