
चंद्रपूर पतंजली मेगा स्टोअरवर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने धडक कारवाई करत नियमांचे उल्लंघन करणारा 45 हजार 970 रुपये किमतीचा औषधसाठा जप्त केला. या कारवाईमुळे शहरातील औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पतंजली मेगा स्टोअरमध्ये अचानक तपासणी केली. तपासणीदरम्यान स्टोअरमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या काही औषधांवर आक्षेपार्ह दावे आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आढळून आल्या. संबंधित औषधांच्या वेष्टनांवर लठ्ठपणा, दमा, हृदयविकार आणि ताप यांसारख्या आजारांवर गुणकारी असल्याचे दावे करण्यात आले होते.
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘औषधे आणि जादुई उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा, 1954’ अंतर्गत अशा प्रकारच्या जाहिरातींना बंदी आहे. या कायद्यानुसार विशिष्ट आजारांवर निश्चित उपचार किंवा हमखास परिणाम दर्शविणाऱ्या जाहिराती करणे गुन्हा मानला जातो. ग्राहकांची दिशाभूल होऊ नये आणि सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण व्हावे, यासाठी अशा जाहिरातींवर कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. तपासणीत गंभीर स्वरूपाचे उल्लंघन आढळून आल्याने FDAच्या पथकाने संबंधित औषधांचा संपूर्ण साठा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या औषधांची एकूण किंमत 45 हजार 970 रुपये असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान, संबंधित प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असून, औषध विक्रेते आणि उत्पादकांनी औषधांच्या जाहिराती व विक्री करताना कायद्याचे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.




























































