नीती आयोगाच्या शालेय शिक्षण सर्वेक्षणात पंजाब देशात अव्वल; २७ व्या स्थानावरून थेट पहिल्या क्रमांकावर झेप – अरविंद केजरीवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पंजाबच्या शिक्षण क्षेत्रातील कामगिरीचे कौतुक केले आहे. केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या सर्वेक्षणात पंजाबने केरळला मागे टाकत देशात पहिला क्रमांक पटकावला असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. ANI ने यासंदभात वृत्त दिले आहे.

X वर केलेल्या एका पोस्टमध्ये केजरीवाल म्हणाले की, २०२२ मध्ये आपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर अवघ्या चार वर्षांत पंजाबने शिक्षण क्षेत्रात हे यश मिळवले आहे. पूर्वीच्या एका मूल्यांकनात पंजाब २७ व्या स्थानावर होता, तिथून या राज्याने आता पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

अरविंद केजरीवाल म्हणाले, “सरकारी शाळांच्या शिक्षणात एकेकाळी २७ व्या क्रमांकावर असलेला पंजाब आता पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. या प्रक्रियेत पंजाबने केरळसारख्या राज्यांनाही मागे टाकले आहे. आमचे सरकार २०२२ मध्ये स्थापन झाले, तर २०२० च्या सर्वेक्षणात पंजाब २७ व्या स्थानावर होता. २७ व्या स्थानावरून थेट नंबर एक बनणे, आमचे सरकार येऊन केवळ चार वर्षे झाली आहेत.” सरकारी शाळांमधील हा बदल ऐतिहासिक असल्याचे सांगत हा पक्ष शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील सुधारणांवर लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी म्हटले.