
शिंदे गटाचे आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा मुलगा नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर हे एका कॅसिनोमध्ये जुगार खेळत असल्याची चित्रफित दाखवत, टक्केवारीतून वडिलांनी मिळवलेले पैसे मुलगा कॅसिनोमध्ये उडवत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आज पत्रकार परिषदेत केला. ‘बाप नंबरी आणि बेटा दस नंबरी’ असे सर्व परिसीमा पार केलेल्या या पिता-पुत्रांकडून अपेक्षाच संपल्याची टीकाही त्यांनी केली. यावेळी विशाल देवकुळे, सुनील मोदी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
गेली कित्येक वर्षे विकासकाम कमी व बदनामी जादा अशा विळख्यात अडकलेले स्वयमघोषित नेतृत्व म्हणजे राजेश क्षीरसागर आहेत. कोल्हापूर शहरात गांजा, जुगार, मॅच बेटिंगमुळे नवीन पिढी बरबादीकडे पाऊल टाकत आहे. तर याच शहरातील आमदारांचा सुपुत्र खुलेआम कॅसिनो खेळताना दिसतो, मग कोल्हापूरकरांनी यांच्याकडून काय बोध घ्यायचा? तसेच महानगरपालिकेत शिंदे गटाच्या माध्यमातून खून करणारे, जुगार खेळणारे नगरसेवक झाले. पण नेमका विकास कधी व कोणाचा होणार, असे सवालही इंगवले यांनी उपस्थित केले. तर भविष्यातील पिढीला वाया जाण्यास खतपाणी घालणाऱयांना मतदान करून आपण काय मिळवले, असा सवाल इंगवले यांनी यानिमित्ताने जनतेला उपस्थित केला.
































































