
कसारा–मोखावणे परिसरात खासगी विकासकाने स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीर सुरुंग स्फोट घडवून बंधारा बांधला आहे. यामुळे कसारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाला हानी पोहोचली असून अवैध सुरुंग स्फोटांमुळे जलस्रोत आटले आहेत. तलाव कोरडेठाक पडल्याने कसारा शहरात तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. परिणामी पाण्यासाठी कसारावासींवर भटकंती करण्याची वेळ आली आहे.
कसारा–मोखावणे येथील नागगील नागरी रस्तानजी प्रॉपर्टी या खासगी विकासकाने बंगले, फार्महाऊससाठी प्लॉटिंगचे काम सुरू केले. या विकासकाला विविध कामांसाठी व खासगी बंधारा बांधण्यासाठी ग्रामपंचायतीने परवानगी दिली. ग्रामसभेत विकासकाला सुरुंग स्फोट तसेच विविध कामांना परवानग्यादेखील देण्यात आल्या. ग्रामसभेचा ठराव असल्यामुळे ठेकेदारांनी बेकायदेशीर विहिरी खोदणे, सुरुंग स्फोट घडवणे सुरू केले.
गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाचवे ते सातवे मीटर अंतरावर डोंगर, टेकड्या फोडण्यासाठी दररोज सुरुंग स्फोट घडवण्यात आले. डोंगर फोडून खासगी बंधारेदेखील तयार करण्यात आले. परंतु विकासकाच्या सुरुंग स्फोटामुळे कसारा तलावातील जलस्रोत आटले.
जिवंत झऱ्याची दिशा बदलली
सुरुंग स्फोटामुळे जिवंत झऱ्याची दिशा बदलली. आजमितीस तलाव पूर्णपणे आटला आहे. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस नळाला येणारे पाणीही बंद झाले आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.































































