भाजपला ‘दुहेरी’ धक्का; अन्नामलाई साथ सोडण्याच्या तयारीत, राज्यसभेच्या 4 जागाही हातच्या जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिणेकडील महत्त्वाचे राज्य असलेल्या तामीळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी होत असून भाजपचा एकाचवेळी दोन धक्के बसण्याची शक्यता आहे. एकीकडे तामीळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई हे भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असून आज पत्रकार परिषद घेऊन ते आपली भूमिका जाहीर करू शकतात. तर दुसरीकडे, अन्नामलाई यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शेजारील राज्य आंध्र प्रदेशमध्ये मोठा निर्णय घेतला असून तिथल्या राज्यसभेच्या चारही जागा मित्रपक्षांसाठी सोडून दिल्या आहेत. त्यामुळे आंध्र प्रदेशच्या राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या हाती काहीच लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

तामीळनाडूमध्ये भाजपचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या के. अन्नामलाई यांच्या राजकीय भूमिकेबाबत गेल्या काही दिवसांपासून तर्कवितर्क लढवले जात आहेत. 2 जून रोजी अन्नामलाई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष नितीन नबीन आणि बी. एल. संतोष यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांशी चर्चा केली होती. या बैठकीनंतर त्यांनी भाजप नेतृत्वाचे आभार मानत भविष्यात एकत्र काम करण्याचे मार्ग खुले ठेवले असले तरी आता आपल्याला नवीन मार्गाने पुढे जायचे आहे, असे स्पष्ट संकेत दिले होते. त्यांना पक्षात रोखण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेले सर्व प्रयत्न अपयशी ठरल्याचे दिसत आहे.

आंध्र प्रदेशमधील गणित बिघडले

आंध्र प्रदेशमध्ये राज्यसभेच्या 4 जागांसाठी जागावाटपाचा एक फॉर्म्युला निश्चित मानला जात होता. त्या फॉर्म्युल्यानुसार तेलुगु देसम पार्टीला 2 जागा, पवन कल्याण यांच्या जनसेना पार्टीला 1 जागा आणि भाजपला 1 जागा मिळणरा होती. भाजप आपल्या कोट्यात येणाऱ्या या एका जागेवरून के. अन्नामलाई यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या तयारीत होती. मात्र, आता अन्नामलाई पक्ष सोडण्याच्या पवित्र्यात असल्याने भाजपने या जागेवरील आपला दावा सोडला आहे.

नवा फॉर्म्यूला

4 जून रोजी अमरावती येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपाच्या नव्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार आता मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष 3 जागांवर आपले उमेदवार उभे करणार असून पवन कल्याण यांच्या जनसेना पार्टीला 1 जागा मिळणार आहे.

विधानसभेचे तिकीट कापले

तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने अन्नामलाई यांचे तिकीट कापले होते. एआयएमडीएमकेसोबत असलेल्या कटू संबंधांमुळे भाजपने अन्नामलाई यांना निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर काढल्याचे बोलले जात होते. मात्र भाजपच्या या निर्णयामुळे अनेकांना मोठा धक्का बसला होता.