
‘सुवर्ण सिंहासन सजले, रायगडाचे भाग्य उजळले…चौघडे आणि ढोल वाजले, शिवबा आपले राजे झाले…’ या गाण्याचे सूर आज किल्ले रायगडावर गुंजले आणि हजारो शिवभक्तांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. निमित्त होते शुक्रवारपासूनच भगव्या उत्साहात सुरू झालेल्या 352 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे. तलवारींचा खणखणाट, ढोल-ताशांचा गजर आणि शिवरायांचा गगनभेदी जयजयकार यामुळे रायगडावर जणू शिवकाळ अवतरला आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतून मावळे हिंदवी स्वराज्याच्या राजधानीत आले असून अवघा किल्ला भगव्या झेंडय़ात न्हाऊन निघाला आहे. येथील मातीच्या कणाकणातून ऐकू येतोय तो फक्त शिवरायांचाच जयजयकार.






























































