
देशाचे सरन्यायाधीश सूर्य कांत युनायटेड किंगडनमच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान बर्कबेक, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथे आयोजित व्याखानावेळी गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमात उपस्थितांनी सरन्यायाधीशांना हिंदुस्थानातील विरोधी मतप्रवाह आणि तरुणांना उद्देशून केलेल्या झुरळ वक्तव्यावरून प्रश्न विचारले. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यूकेतील हिंदुस्थानी दूतावासाने या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करत हे वर्तन अशोभनीय असल्याचे म्हटले आहे. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
नेमकं काय घडलं?
4 जून रोजी सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आंतरराष्ट्रीय कायदा’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. भाषण संपल्यानंतर जेव्हा प्रश्नोत्तरांचे सत्र सुरू झाले तेव्हा एका श्रोत्याने विषयाला बगल देत हिंदुस्थानातील लोकशाहीच्या सद्यस्थितीवर बोट ठेवले. सध्या हिंदुस्थानात विरोधी विचारांबद्दल आणि मतप्रवाहांबद्दल शत्रुत्वाची भावना वाढीस लागली आहे, अशी चिंता आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्त होत आहे. हीच भावना सरन्यायाधीश यांच्या भाषणातूनही प्रतिबिंबित होते, असा थेट आरोप या श्रोत्याने केला. त्याच वेळी, दुसऱ्या एका श्रोत्याने सरन्यायाधीशांनी तरुणांबाबत केलेल्या झुरळ वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.
#watch CJI Justice Surya Kant Faces Heated Q&A in #London Lecture
Chief Justice of India Justice Surya Kant delivered a public lecture on “Artificial Intelligence and International Law” at Birkbeck University of London on June 4, 2026. During the Q&A, an audience member… pic.twitter.com/Z8y9qpYHdB
— Thepagetoday (@thepagetody) June 5, 2026
दरम्यान, वाद वाढताना पाहून आयोजकांनी प्रश्न विचारणाऱ्या रोखले आणि आजच्या कार्यक्रमाचा विषय फक्त कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आंतरराष्ट्रीय कायदा हाच असल्याने मी या राजकीय प्रश्नांना मंजुरी देऊ शकत नाही, अशी भूमिका घेतली. यानंतर काही श्रोत्यांनी तीव्र आक्षेप घेत जागेवर उभे राहून घोषणाबाजी आणि हातवारे करण्यास सुरुवात केली. आयोजकांनी कृपया शांत व्हा आणि हे थांबवा, असे आवाहन केले, परंतु तोपर्यंत सभागृहातील वातावरण कमालीचे तणावपूर्ण झाले होते.
दूतावासाकडून तीव्र शब्दात निषेध
सरन्यायाधीशांसमोर घडलेल्या या संपूर्ण प्रकारावर लंडनमधील हिंदुस्थानी दूतावासाने शुक्रवारी अधिकृत पत्रक काढून संताप व्यक्त केला. लोकशाहीत मतभेद असणे स्वाभाविक आहे, परंतु ते सुसंस्कृत आणि आदरयुक्त पद्धतीने मांडले पाहिजेत. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर असे अशोभनीय वर्तन करणे अजिबात स्वीकारहार्य नाही, अशा कडक शब्दांत दूतावासाने सुनावले.
काय होते विधान?
बेरोजगार तरुण हे झुरळांसारखे असतात. आरटीआय कार्यकर्ते होऊन ते व्यवस्थेवर हल्ला करतात, असे वक्तव्य सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका सुनावणीदरम्यान केले. यावरून त्यांच्यावर सर्वच स्तरातून सडकून टीका झाली. जनमानसात संतापाची लाट उसळली, मात्र आपल्या शब्दांचा विपर्यास केला गेला असा खुलासा सरन्यायाधीशांनी केला. बोगस पदव्या घेऊन वकिली किंवा अन्य क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या व समाजव्यवस्थेचे नुकसान करणाऱ्या घटकांवर मी टीका केली होती, असे स्पष्टीकरण सरन्यायाधीशांनी दिले.

























































