Share Market News – अमेरिकेनंतर आता हिंदुस्थानी शेअर बाजारात घसरगुंडी? गिफ्ट निफ्टी 359 अंकांनी कोसळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या शेअर बाजारात दबाव आहे. जागतिक अशांततेमुळे शेअर बाजारात मोठी घसरण होत आहे. तसेच FII कडून (परकीय गुंतवणूकदार) सातत्याने विक्रीचा सपाटा सुरू असल्याने बाजारात तीव्र घसरण होत आहे. परकीय गुतंवणूकदारांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी केंद्रीय रिझर्व्ह बँकेने मोठे निर्णय घेतले आहेत. मात्र, त्याला बाजाराकडून सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. तसेच गिफ्ट निफ्टी ३५६ अंकांनी घसरला आहे. त्यामुळे सोमवारी बाजारात आणखी मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.

RBI ने रेपो दरात कोणताही बदल केले नाहीत. मात्र, परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, निफ्टी व सेन्सेक्स शुक्रवारी किंचित घसरणीसह बंद झाले. आता, सोमवारी मोठ्या घसरणीची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून, त्याचा परिणाम सोमवारी हिंदुस्थानी बाजारातही जाणवू शकतो.

गिफ्ट निफ्टी ३५६ अंकांनी खाली आला आहे. त्यामुळे हिंदुस्थानी शेअर बाजार सोमवारी मोठ्या गॅप-डाउनने उघडू शकतो. अनेक प्रमुख शेअर्समध्येही घसरण होऊ शकते. शुक्रवारी हिंदुस्थानी बाजारातच नाही तर अमेरिकन बाजारातही मोठी घसरण झाली आहे. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेजपासून ते एस अँड पी ५०० पर्यंत, निर्देशांकात या वर्षातील सर्वात मोठी घसरण झाली आहे. एस अँड पी ५०० २.६४% ने घसरून ७,३८३.७४ वर बंद झाला, जी १० ऑक्टोबर, २०२५ नंतरची एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे.

टेक स्टॉक्सचा समावेश असलेला नॅसडॅक कंपोझिट शुक्रवारी ४.१८ टक्क्यांनी घसरून २५,७०९.४३ वर बंद झाला. एप्रिल २०२५ नंतरची ही त्याची सर्वात मोठी एका दिवसातील घसरण होती. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेजदेखील १.३५ टक्क्यांनी घसरून ५०,८६६.७८ वर बंद झाला.

एआय (AI) आणि टेक स्टॉक्समधील मोठ्या विक्रीमुळे अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. आता, सोमवारी, हिंदुस्थानी बाजारातही अशाच मोठ्या घसरणीची चिन्हे दिसत आहेत. या घसरणीमागे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकेची रोजगारविषयक आकडेवारी ठरणार आहे.

मे महिन्यातील अमेरिकेची रोजगारविषयक आकडेवारी अपेक्षेपेक्षा चांगली होती. त्यामुळे यावर्षी फेडरल व्याजदरात वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. फेड डिसेंबरपर्यंत दरात २५ बेसिस पॉइंट्सची वाढ करू शकते आणि ही वाढ आणखीही होण्याची शक्यता आहे. या दरवाढीमुळे महागाईचा धोकाही निर्माण होतो. त्याचा परिणाम जागतिक आणि कॉर्पोरेट नफ्यावर होऊ शकतो. या अपेक्षेमुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे.

जागतिक अस्थिरतेच्या भीतीमुळे, अमेरिकन ट्रेझरी यील्ड्स वाढले आहेत. बाँडच्या किमती आणि यील्ड्स विरुद्ध दिशेने जातात आणि शुक्रवारी बाँडच्या किमती घसरल्याने शेअर बाजारात गुंतवणूक कमी झाली, परिणामी स्टॉक्सवर दबाव आला. तसेच नफावसुलीच्या या लाटेमुळे बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली. वॉल स्ट्रीटचा VIX निर्देशांक एकाच दिवसात ३९% पेक्षा जास्त वाढला, ज्यामुळे बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे संकेत मिळाले.

आर्थिक आकडेवारीव्यतिरिक्त, जागतिक अनिश्चिततेचाही बाजारातील गुंतवणूकदारांवर परिणाम झाला. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील शस्त्रसंधी करार हिजबुल्लाहने नाकारल्यानंतर आखाती देशातील तणाव पुन्हा वाढला. अमेरिका-इराण शांतता चर्चेभोवतीच्या अनिश्चिततेमुळेही चिंतेत भर पडली. त्यामुळे अमेरिकी बाजारात शुक्रवारी मोठी घसरण झाली आहे. त्याचे पडसाद सोमवारी हिंदुस्थानी शेअर बाजारावर दिसण्याची शक्यता आहे.